अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात दोघांना सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:10 PM2019-04-12T23:10:56+5:302019-04-12T23:11:33+5:30
औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारे फकीरचंद दाभाडे आणि पंढरीनाथ हिवर्डे या दोघांना ...
औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारे फकीरचंद दाभाडे आणि पंढरीनाथ हिवर्डे या दोघांना सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आधी मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानंतर १४ आॅगस्ट २०१५ रोजी त्यांनी पुरवणी जबाब नोंदविला की, फकीरचंद पांडुरंग दाभाडे (रा. मुकुंदनगर) याने दुचाकीवरून मुलीचे अपहरण केले. अल्पवयीन मुलीला दाभाडेने त्याचा मित्र पंढरीनाथ भीमराव हिवर्डे (रा. रांजणगाव) याच्या खोलीवर नेले. त्यानंतर दाभाडेने बजाजनगरमध्ये खोली किरायाने घेतली आणि तेथे राहू लागला. त्याच खोलीत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. त्यानंतर पंढरीनाथ हिवर्डेच्या कारमधून बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरवाडी येथे देवदर्शनाला नेले. फकीरचंद काही कामनिमित्त बाहेर गेला असता पंढरीनाथ हिवर्डेनेसुद्धा मुलीवर जबरदस्ती अत्याचार केल्याचे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून फकीरचंद दाभाडे आणि पंढरीनाथ हिवर्डे या दोघांविरुद्ध भादंवि आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक ई. बी. वरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यामध्ये अल्पवयीन मुलगी, तिचे वडील आणि घरमालकाची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने फकीरचंद दाभाडे आणि पंढरीनाथ हिवर्डे या दोघांनाही ‘सामूहिक अत्याचाराच्या’आरोपाखाली भादंवि कलम ३७६ डी, अन्वये प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, तसेच ‘मुलीच्या अपहरणाच्या’ आरोपाखाली भादंवि कलम ३६६ अन्वये दोघांनाही प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.