सीताफळाच्या मोहाने त्याचा दहा दिवस विहिरीत मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:11 AM2018-12-17T00:11:01+5:302018-12-17T00:11:30+5:30
माळीवाडा-आसेगाव शिवारात सीताफळ व बोरं तोडण्यासाठी गेलेला तरुण विहिरीत पडला. निर्मनुष्य असलेल्या या ठिकाणी कुणी पाहिले नाही म्हणून तो दहा दिवस विहिरीतच होता. सुदैवाने बाजूच्या शेतातून जाणाऱ्या एका ‘देवदूता’ने त्याला सुखरूप बाहेर काढले.
दौलताबाद : माळीवाडा-आसेगाव शिवारात सीताफळ व बोरं तोडण्यासाठी गेलेला तरुण विहिरीत पडला. निर्मनुष्य असलेल्या या ठिकाणी कुणी पाहिले नाही म्हणून तो दहा दिवस विहिरीतच होता. सुदैवाने बाजूच्या शेतातून जाणाऱ्या एका ‘देवदूता’ने त्याला सुखरूप बाहेर काढले.
राजू बगदार आणि अहेमद बगदार यांचे माळीवाडा-आसेगाव शिवारात शेत असून त्यात एक विहीर आहे. त्याच्या आजूबाजूला झाडेझुडपे असल्याने विहीर दिसत नाही. तेथे धरमसिंग विके (१६, रा. गोंडवस्ती माळीवाडा) हा तरुण तेथील झाडाचे बोरं तोडायला गेला असता त्याला सीताफळाचे झाड दिसले. बोरं तोडल्यानंतर त्याला सीताफळ तोडण्याचा मोह झाला. या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि तो या कोरड्या ३० फूट विहिरीत पडला. हा परिसर निर्मनुष्य असल्याने इकडे कुणीही फिरकत नाही. त्यामुळे धरमसिंगने आरडाओरड करूनही उपयोग झाला नाही. धरमसिंगची आई, सहा बहिणी, चार भाऊ त्याला शोधून थकले. हे सर्व जण मिळेल ते काम करून उपजीविका भागवितात.
...अन् तो शेतकरी देवदूत ठरला
शनिवारी मन्सूर पठाण हे आपल्या शेतात चक्कर मारायला या भागातून जात असताना त्यांना विहिरीतून आवाज आला. त्यांनी विहिरीजवळ जाऊन बघितले असता त्यांना सदर तरुण दिसला. त्यांनी जवळच असलेला त्यांचा भाऊ बाबा पठाण यांना बोलावले व दोन्ही भावांनी धरमसिंगला दोराच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढले. तो थरथर कापत होता. विचारपूस केल्यावर त्याने नाव व पत्ता सांगितला. दोन्ही भावांनी त्याला त्याच्या घरी सुखरूप आणून सोडले. सदर माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोज सिरसाट यांना मिळाली. त्यांनी त्याला माळीवाडा येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. प्रथमोपचार करून त्याला सुटी देण्यात आली. त्याचा हात मोडला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.