लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहरात राहणाºया व आपल्या गावी सुट्टीवर गेलेल्या एका जिल्हा परिषद शिक्षकाने तीन खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. ते पैसे परत करुनही हे सावकार छळत असत. या छळास कंटाळून रविवारी सकाळी शिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी त्यांच्याजवळ सापडली असून चिठ्ठीत माझ्या मृत्यूस तिघे जण कारणीभूत आहेत, असा मजकूर लिहिलेला आहे.श्रीकृष्ण गंगाधर चौधरी (४६, रा. कुंभारवाडी, हल्ली मुक्काम गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. चौधरी हे तालुक्यातील आमला येथे शिक्षक होते. शाळेला सुट्या असल्याने दोन दिवसांपूर्वी ते आपल्या गावी कुंभारवाडी येथे गेले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी किरण निवृत्ती गावडे, कल्याण तळेकर व केशव गावडे यांच्याकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. ती रक्कम त्यांना परतही केली; मात्र रक्कम दे, असा ते पुन्हा पुन्हा तगादा लावत असत. पैशासाठी कल्याण तळेकर याने चौधरी यांना मारहाणही केली होती. हा अपमान सहन न झाल्यानेच चौधरी यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी सविस्तर मजकूर लिहिला असून तो पोलिसांचा हाती लागला आहे. ही चिठ्ठी पोलीसांनी जप्त केली आहे. या खाजगी सावकारांविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकानी केली आहे. या प्रकरणी अमोल श्रीकृष्ण चौधरी यांच्या फिर्यादीवरून गेवराई ठाण्यात गुन्हा झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
सावकारांचा जाच; शिक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 11:35 PM