ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:04 AM2021-05-24T04:04:46+5:302021-05-24T04:04:46+5:30
औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यासाठी ही अत्यंत सुखावह बाब असली ...
औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यासाठी ही अत्यंत सुखावह बाब असली तरी कोरोनाचे संकट संपलेले नाही. चक्रीवादळासारखी अचानक लाट येते तेव्हा आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघतात. दहा महिन्यांपासून मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची केवळ चर्चाच सुरू आहे. सुरुवातीला लिक्विड ऑक्सिजन प्लांटचा निर्णय झाला नंतर नैसर्गिक वायूपासून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा उभारण्याची घोषणा झाली. मात्र, प्रत्यक्षात सध्या प्लांट उभारण्याची कोणतीही हालचाल दिसत नाही.
शनिवारी औरंगाबाद शहरात ११९ तर ग्रामीण भागात २९३ बाधित रुग्ण आढळून आले. शहरात सध्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये १ हजार ६३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बहुतांशी रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे. शनिवारी जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये २३.९८ तर शासकीय रुग्णालयांमध्ये १५.८० टन ऑक्सिजन लागले. दररोज २४ तासांत जिल्ह्यात ३९ ते ४० टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा नसला तरी जिल्ह्याची गरज दीड महिन्यापूर्वी तब्बल ६५ ते ७० टन पर्यंत पोहोचली होती. आज जेवढे ऑक्सिजन लागत आहे त्यापेक्षा दुप्पट गरज पडली तर काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये ३५० बेडची व्यवस्था आहे. मेल्ट्रॉनसह शहरातील इतर सीसीसींमध्ये फक्त ऑक्सिजनसाठी एक हजार बेड तयार करण्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली होती. दुर्दैवाने ही प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही.
शासनाकडून दोन प्लांटची घोषणा
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे शासनाकडून २ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे आश्वासन मनपाला दिले होते. मात्र, ही प्रक्रिया लालफितीत अडकली आहे. या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. २० टन क्षमता असलेले प्लांट या ठिकाणी कधी उभे राहणार, असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे.
आदेश प्राप्त होताच काम सुरू होणार
राज्य शासनाकडून दोन प्लांट उभारणीच्या संदर्भात आदेश प्राप्त होताच कामाला सुरुवात करण्यात येईल. प्लांट उभारणीसाठी फक्त बारा ते पंधरा दिवस लागतील. ज्या ठिकाणी प्लांट उभारायचा आहे तेथील सिव्हिलची कामे यापूर्वीच झालेली आहेत, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.