औरंगाबाद : खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने भाजलेल्या शेतकऱ्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीने मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने शनिवारी घाटीत ठिय्या मांडला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखेर चार तासांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
रुस्तुम माणिकराव पठाडे (वय ५२, रा. आडगाव सरक) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. २७ डिसेंबर रोजी शेतात बकऱ्या चारत असताना चिनीमातीची चिमणी नसल्याने ११ केव्हीच्या विद्युत खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. त्या खांबामुळे ते गंभीर भाजले गेले. त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च आला. त्यानंतर आर्थिक परिस्थिती नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना उपचारांसाठी घाटीत दाखल केले. या ठिकाणी उपचार सुरू असताना ८ जानेवारीला सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह महावितरणच्या कार्यालयात घेऊन जाण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. त्यामुळे घाटी रुग्णालयासह महावितरणच्या मिल कार्नर येथील कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही घाटीत धाव घेत मृताच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
विद्युत निरीक्षकाच्या अहवालाची प्रतीक्षाया खांबाच्या चिमणीच्या दुरुस्तीसंदर्भात संबंधित लाईनमनला माहिती देण्यात आली होती. परंतु, त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे लाईनमन आणि जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची, कुटुंबातील दोन व्यक्तींना महावितरणने कायमस्वरुपी नोकरीत घेणे, कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. अखेर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, याप्रकरणी विद्युत निरीक्षकांचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले