अवकाळीने मराठवाड्यातील ८२ हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल; ५.६१ टक्केच झाले पंचनामे
By विकास राऊत | Published: March 21, 2023 12:42 PM2023-03-21T12:42:43+5:302023-03-21T12:43:57+5:30
विभागातील सात जिल्ह्यांमध्ये नुकसान; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ६ ते ८ व १४ ते २० मार्च या काळात झालेल्या अवकाळी पावसाचा ८२ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. आठ जिल्ह्यांत या काळात १२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १९ मार्चपर्यंतच्या अहवालानुसार जिरायत ४९ हजार हेक्टर, बागायत २६ हजार हेक्टर, तर साडेपाच हजार हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले.
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गहू, कांदा, हरभरा, फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार हेक्टर, जालना १५ हजार हेक्टर, परभणी ३२७५ हेक्टर, हिंगोली साडेपाच हजार, नांदेड २३ हजार ८०१ हेक्टर, बीड ११ हजार, लातूर जिल्ह्यात साडेअकरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
१ लाख शेतकरी बाधित
६ ते १९ मार्चपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे विभागातील १ लाख ५ हजार २४८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात अद्याप धाराशिव जिल्ह्यातील आकडे समोर आले आहेत. मराठवाड्यातील ५४ हजार १७१ कर्मचारी संपावर होते. सोमवारी सायंकाळी संप मिटला आहे. ८२ हजार पैकी ४६०५ हेक्टर म्हणजेच ५.६१ टक्के पंचनामे एकूण नुकसानीच्या तुलनेत झाले आहेत.
२२ मार्चपर्यंत पंचनामे पूर्ण करा
मराठवाड्यात मागील २० दिवसांत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे १ लाख ५ हजार २४८ शेतकऱ्यांचे ८२ हजार ३५.०८ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अंदाज असून येत्या २२ मार्चपर्यंत प्रत्यक्षात पंचनामे पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करा, असे निर्देश सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले.