- प्रशांत तेलवाडकर
हर्सूल येथील इमारतीला मध्यवर्ती कारागृह म्हटले जात असले तरी ती मूळची मोगलकालीन सराई होती. औरंगजेबने या सराईचा उपयोग विश्रामगृह म्हणून केला होता. त्याकाळी औरंगजेब बादशाहकडे ‘जाट’ सैनिकांचे विशेष लष्कर असायचे आणि त्या सैनिकांना उतरण्यासाठी हर्सूलपासून जवळच उतरण्याची सोय केली जायची. ज्या जागेवर जाट सैन्य राहिले होते आज त्या जागेत जटवाडा म्हणून ओळखले जात आहे. निजामकाळापर्यंत येथील जागेच्या बाबतीत काळजी घेतली गेली.
इमाम अब्दुल रेहमान यांनी सन १९३५ पर्यंत ‘सराई का दरोगा’ म्हणून त्या सराईची काळजी घेतली. नंतर ब्रिटिशकाळात या सराईच्या काही भागाचे रूपांतर जेलमध्ये करण्यात आले. सन १९३६ साली ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सत्याग्रहींना येथेच डांबून ठेवले होते. नंतरच्या काळात या जेलमध्ये निजामाने मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना अटक करून येथेच ठेवले होते.
निजामकाळात शहरातील सर्व दरवाजे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उघडण्यात यायचे आणि त्यामुळे पर्यटक आणि व्यापारी यांना शहरात येण्यास मदत व्हायची; मात्र सायंकाळनंतर जर शहरातील दरवाजे बंद झाले तर त्यावेळी व्यापाऱ्यांना व पर्यटकांना सुरक्षित जागा मिळणे कठीण होऊन बसायचे. मग ते या सराईचा आधार घेत असत. या परिसरातील उत्कृष्ट वास्तुशिल्पाचे नमुने, बागबगिचा, मोकळ्या प्रशस्त घुमटाकार खोल्या, मोकळी जागा हर्सूलच्या सौंदर्यात भर घालत असायची. या परिसरातील मुख्य घुमटाकार खोलीच्या पायथ्याशी असलेली जागा कमळाच्या पानांनी आणि फुलांनी बहरलेली असायची आणि खोलीच्या चारही बाजूंनी षटकोनी आकाराचे बुरुज आजही मोगलकालीन वास्तुशिल्पाची आठवण करून देत आहेत.
मनपाकडे असलेल्या १५० प्राचीन वास्तूच्या यादीत या सराईचाही उल्लेख आहे. मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर या सराईला हर्सूल जेल म्हटल्या जाऊ लागले. त्यानंतर हे मध्यवर्ती कारागृह बनले. येथे अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंडांनाही शिक्षेनंतर काही काळ या कारागृहात ठेवण्यात आले होते. आज क्षमतेपेक्षा अधिक बंदिजन या कारागृहात आहेत.