मनपाने केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 03:38 PM2019-03-31T15:38:39+5:302019-03-31T15:39:47+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीची तिसऱ्यांदा नाचक्की

Municipal corporation sealed the office of the Agricultural Produce Market Committee in Aurangabad | मनपाने केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सील

मनपाने केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सील

googlenewsNext
ठळक मुद्देतीन कोटी थकीत मालमत्ताकरप्रकरणी कारवाई 

औरंगाबाद : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मोकळ्या जागेवरील २ कोटी ७९ लाख  रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. महानगरपालिकेने ३० मार्च रोजी सायंकाळी धडक मोहीम राबवून समितीच्या कार्यालयास सील ठोकले. अशा प्रकारे नाचक्की होण्याची कृउबाची ही तिसरी वेळ आहे. उल्लेखनीय म्हणजे मनपावर युतीची सत्ता, तर कृउबावर भाजपाची सत्ता आहे.  

कृउबाच्या थकीत मालमत्ता करापोटी यापूर्वी मनपाने तक्रारीचे निवारण करून त्यात दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानुसार रीतसर देयक देऊन जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच ३ वेळेस कृउबाच्या पदाधिकाऱ्यांची बोलणी झाली होती; पण तरीही मालमत्ता कर न भरल्याने अखेर मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या आदेशाने व करनिर्धारक व संकलक महावीर पाटणी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने जाधववाडी येथे सायंकाळी ५ वाजता कृउबाच्या कार्यालयास सील ठोकले. कृउबाकडे ६४ हेक्टर ०४ आर एवढी जागा आहे. त्यावर गाळे, सेल हॉल उभारण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त जी खुली जागा आहे. या जागेच्या मालमत्ता कराची थकबाकी २ कोटी ७९ लाख ३६ हजार १०३ रुपये इतकी आहे. बाजार समितीने हा कर भरावा यासाठी पालिकेने नोटिसा बजावल्या होत्या; पण त्याचा उपयोग न झाल्याने मनपाने शनिवारी कारवाई केली. यापूर्वी कृउबावर भाजपाची सत्ता असताना व त्यानंतर प्रशासक असताना अशा दोन्ही वेळेस मनपाने समितीचे कार्यालय सील केले होते. मात्र, नंतर वाटाघाटी झाल्याने सील काढण्यात आले होते. 

आज पुन्हा एकदा कार्यालयास सील ठोकल्याने कृउबाची नाचक्की झाली आहे. उद्या, रविवार असल्याने कृउबास सुटी आहे. यामुळे सोमवारी काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सील ठोकण्याची कारवाई वॉर्ड अधिकारी कमलाकर ज्ञाते, मीरा चव्हाण, शाखा अभियंता सुभाष मोटे, कर निरीक्षक प्रभू चव्हाण, रमेश घुले, राहुल बनकर, शेषराव वाघमारे आदींनी केली.

प्रोझोनकडून वसूल केले १ कोटी ४५ लाख 
 प्रोझोन मॉल येथेही २ कोटी ८९ लाख रुपये एवढी मालमत्ताकर थकबाकी होती. महानगरपालिकेचे पथक थकबाकी वसुलीसाठी गेले असता. प्रोझोन प्रशासनाने १ कोटी ४५ लाख ३१ हजार ५४४ रुपये एवढी थकबाकी भरून टाकली. उर्वरित रक्कम पुढील महिन्यात भरण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने कारवाई करण्यात आली नाही, असे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

न्यायालयाच्या अवमानप्रकरणी याचिका दाखल करणार
मोकळ्या जागेवर मालमत्ता कर आकारला जात नाही. राज्यातील कोणत्याच मनपाने तेथील कृउबात अशा प्रकारे मोकळ्या जागेवर कर आकारला नाही; पण औरंगाबाद मनपा कर आकारत आहे. याप्रकरणी कृउबाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. २०१६ मध्ये न्यायालयाने आदेश दिले होते की, कृउबाने २५ लाख रुपये भरावे व मनपाने पुढील आदेश येईपर्यंत कृउबावर कोणतीच कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही मनपाने आज कार्यालय सील करून न्यायालयाचा अवमान केला आहे. आम्ही सोमवारी न्यायालयात मनपाविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहोत. 
- राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: Municipal corporation sealed the office of the Agricultural Produce Market Committee in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.