पैठण : पैठण शहरातील नेहरू चौक परिसरातील प्रस्तावित जलकुंभ बांधण्यासाठी लागणारी जागा हस्तांतरित
करून घेण्यासाठी नगर परिषदेने जमिनीचे भोगवाटा मूल्य ८ लक्ष ६८ हजार रुपये शासन खाती जमा करावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दोन वर्षांपासून जागेअभावी रखडलेल्या जलकुंभाच्या कामासाठी जमिनीचे मूल्य आता नगर परिषद प्रशासन कधी भरणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पैठण शहरातील लोकसंख्या लक्षात घेता वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून नेहरू चौक व नवनाथ मंदिर परिसरात दोन जलकुंभाच्या बांधकामास दोन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. जलकुंभाच्या कामास मात्र प्रारंभ झालेला नव्हता.
जनतेतून उठाव झाल्यानंतर जलकुंभाच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्याचे समोर आले. यानंतर पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाच्या जून २०२० च्या बैठकीत न.प. कार्यालयासमोर असलेल्या जुन्या तहसील कार्यालयाची जागा न.प. ने हस्तांतरित करून घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, अद्याप या जागेच्या हस्तांतरणाच्या कार्यवाहीस चालना मिळालेली नव्हती. पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या या भागातील जनतेने याबाबत तीव्र उठाव केला. नगरसेवकांनी आंदोलनाचे पत्र दिले. रोहयोमंत्री संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे यांनी जागेची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन केले होते. दुसरीकडे जलकुंभ नसल्याने जनतेला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या.
रविवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
नियोजित जलकुंभाच्या जागेची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी केली होती. जमीन हस्तांतरणाचा प्रश्न दोन दिवसांत सोडविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले होते. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने जागेचे भोगवाटा मूल्य भरण्याचे आदेश सोमवारी न.प. प्रशासनास दिले आहे. यामुळे जलकुंभ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोट
जमिनीची रक्कम, शासन खाती भरणार
जुन्या तहसील कार्यालयाची इमारत असलेली सीटी सर्व्हे क्र. ४४२९ मधील ५५६.६५ चौ. मी. जागा नगर परिषद ताब्यात घेत आहे. या जागेसाठी लागणारी रक्कम लवकरच शासन खाती जमा करण्यात येईल.
-संतोष आगळे, मुख्याधिकारी, न.प. पैठण