सीएमच्या सभास्थळाजवळ चहा विक्रेत्याचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:11 PM2019-04-16T14:11:36+5:302019-04-16T14:12:21+5:30

थंड पाण्याची बाटली न दिल्याने पोटात खुपसला चाकू

murder of tea seller near CM's synagogue at Aurangabad | सीएमच्या सभास्थळाजवळ चहा विक्रेत्याचा निर्घृण खून

सीएमच्या सभास्थळाजवळ चहा विक्रेत्याचा निर्घृण खून

googlenewsNext

औरंगाबाद : मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभास्थळापासून केवळ हजार फुटांवर २८ वर्षीय युवकाचा भोसकून खून झाला. मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांची सभा सुरू होण्यापूर्वी तासभर अगोदर तगडा पोलीस बंदोबस्त असताना सोमवारी रात्री ७ वाजेदरम्यान हा प्रकार घडला. पुंडलिकनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अन्य आरोपी पळून गेले. 

दत्तात्रय गंगाराम शेळके ऊर्फ बंडू (२८, रा. कैलासनगर, गल्ली नं. १) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर युवक गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलसमोर चहाची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आरोपी रविशंकर हरिचंद्र तायडे (२६, रा. गजानन कॉलनी) हा देखील याच परिसरात ‘औरंगाबाद पानटपरी’ चालवतो. सोमवारी त्याचा वाढदिवस असल्याने त्याने टपरी बंद केली. पार्टी करण्याच्या उद्देशाने काही मित्रांसह तो शेळकेच्या चहाच्या टपरीवर आला. त्याने शेळकेला थंड पाण्याची बाटली मागितली; परंतु पाणी थंड नाही,असे उत्तर शेळकेने दिले. त्यामुळे रविशंकरने शेळके याच्या कानशिलात लगावली. 

त्यावरून बाचाबाची व वाद सुरू झाला. ‘थांब तुला दाखवितोच’, असे म्हणून त्याने आदिनाथ उत्तम चव्हाण ऊर्फ चिकू (२१) याला बोलावले. अन्य मित्रही धावून आले. तायडेचा जोर वाढला. त्याने काही मित्रांसह खिशातील चाकू काढून दत्तात्रयवर वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. एकच आरडाओरड सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभास्थळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

तपासून मृत घोषित
जखमी दत्तात्रयला उपचारार्थ पोलीस व नागरिकांच्या  मदतीने खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.  

मोठ्या भावासमोर खून
दत्तात्रयच्या टपरीशेजारी त्याचा मोठा भाऊ जगन्नाथ शेळके यांची पानटपरी असून, ते टपरीवर बसलेले होते. ते हार्टपेशंट आहेत. त्यांच्यासमोरच छोटा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने नागरिक व पोलीस मदतीला धावले. 

वाढदिवसाच्या दिवशी केला खून
आरोपी रविशंकर तायडेचा वाढदिवस असल्याने पार्टीच्या उद्देशाने तो मित्रांसह येथे आला होता. मग खिशात चाकू कशाला?  त्याचा पूर्वनियोजित कट होता काय? असे विविध प्रश्न पोलिसांनाही पडले आहेत.

पूर्वीही चाकूहल्ल्याचा गुन्हा
तायडेच्या मदतीला धावून आलेला आदिनाथ हा गुन्हेगारीवृत्तीचा असून, त्याच्यावर २०१६ मध्ये चाकूहल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यावेळी तो अल्पवयीन होता. दोन्ही आरोपी हे गजानननगर परिसरातीलच रहिवासी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असताना तेथून हाकेच्या अंतरावर खुनासारखी गंभीर घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

इतर पसार आरोपी 
रविशंकर तायडे व आदिनाथ चव्हाण या दोघांना पोलिसांनी अटक केली. इतर चार आरोपी पळून गेले. त्यांच्या मागावर पोलीस पथक रवाना करण्यात आलेले आहे, असे पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

नातेवाईकांचा ठिय्या 
फरार आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेत शासकीय रुग्णालय घाटी येथे आज सकाळी ठिय्या दिला. 

Web Title: murder of tea seller near CM's synagogue at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.