‘सीआयआय’च्या राज्याध्यक्षपदी मुतालीक, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे नारायणन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:02 AM2021-03-05T04:02:06+5:302021-03-05T04:02:06+5:30
औरंगाबाद : भारतीय उद्योग परिसंघाच्या (सीआयआय) राज्य अध्यक्षपदी सुधीर मुतालिक, तर राज्य उपाध्यक्षपदी औरंगाबादचे श्रीराम नारायणन यांची निवड झाली ...
औरंगाबाद : भारतीय उद्योग परिसंघाच्या (सीआयआय) राज्य अध्यक्षपदी सुधीर मुतालिक, तर राज्य उपाध्यक्षपदी औरंगाबादचे श्रीराम नारायणन यांची निवड झाली असून त्यांनी २०२१-२२ या वर्षासाठी या पदांचा कार्यभार स्वीकारला आहे.
पुणे येथील पॉझिटिव्ह मीटरिंग पंप्स (आय) प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुधीर मुतालिक, तर श्रीराम नारायणन हे वाळूज औद्योगिक वसाहतीतील एन्ड्रेस अँड हाऊजर ऑटोमेशन इंस्ट्रुमेंटेशन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत.
यावेळी ‘सीआयआय’चे नवे अध्यक्ष मुतालिक म्हणाले की, ‘सीआयआय’च्या माध्यमातून उद्योगांची वाढ व विकासासाठी आम्ही राज्य सरकारसोबत काम करण्यास वचनबद्ध आहोत. मुतालिक यांनी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई (मेकॅनिकल) पदवी घेतली आहे. ते ‘एमएसएमई’वरील ‘सीआयआय नॅशनल कौन्सिल’चे सदस्य, प्रक्रिया प्लांट मशीनरी असोसिएशनचे संचालक आदींसह विविध उद्योग संस्थांचे सक्रिय सदस्य आहेत.
श्रीराम नारायणन यांना उत्पादन विकास, उत्पादन नियोजन, खरेदी, उत्पादन, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी व्यवस्थापन, ईआरपी अंमलबजावणी, ग्रीन फील्ड प्रोजेक्ट्स, विक्रेता या क्षेत्रात ३० वर्षांचा अनुभव आहे. ते अभियांत्रिकीचे (मेकॅनिकल व प्रॉडक्शन) पदवीधर तसेच बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे (विपणन) पदव्युत्तर आहेत.