‘माझे धैर्य संपले’; मनपा आयुक्तांनी संतप्त आणि भावुक होत व्यक्त केल्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:44 AM2019-03-01T11:44:17+5:302019-03-01T12:40:10+5:30

आयुक्तांनी आपल्यावरील अकार्यक्षमतेच्या ठपक्याचा खुलासा करीत गेल्या ९ महिन्यांतील कामांचा लेखाजोखा मांडला.

'My courage is over'; Emotions expressed by the Municipal Commissioner of Aurangabad | ‘माझे धैर्य संपले’; मनपा आयुक्तांनी संतप्त आणि भावुक होत व्यक्त केल्या भावना

‘माझे धैर्य संपले’; मनपा आयुक्तांनी संतप्त आणि भावुक होत व्यक्त केल्या भावना

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात आल्यानंतर कचरा प्रश्न पाहून रात्री झोप येत नव्हती.कोणी येत नाही, मी आलोसभागृहात नगरसेवकांचा आम्ही तुमच्यासोबतचा सूर

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत आपल्यावरील अकार्यक्षमतेच्या ठपक्याचा खुलासा करीत गेल्या ९ महिन्यांत कचराप्रश्नी, सिटी बस आणि शहरात केलेल्या इतर कामांचा लेखाजोखा मांडला. ‘माझे धैर्य संपले’ असे म्हणत आयुक्तांनी काहीसे संतप्त आणि काहीसे भावुक होत भावना व्यक्त केल्या. यावर सभागृहातील नगरसेवकांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा सूर आळवला. त्यामुळे आयुक्तांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवणारे शिवसेनेचे स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य एकाकी पडले आहेत.

कचराकोंडी, पाणी प्रश्न, अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या यासह विविध १३ मुद्यांवरून स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी आयुक्तांना एक पत्र दिले होते. या पत्राद्वारे आयुक्तांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला होता. याचे पडसाद गुरुवारी (दि.२८) सर्वसाधारण सभेत दिसून आले. सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी प्रत्येक सभेत तेच ते बोलण्याची वेळ येत आहे. सभागृहाबाहेर ठेकेदारांनी ठिय्या मांडला आहे. अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले नाही, असे म्हटले.

भाऊसाहेब जगताप यांनी अधिकाऱ्यांचे वारंवार पदभार काढले जातात. ठेकेदार आतापर्यंत इमारतीच्या खाली थांबत होते. आता ते वर आले, असे ते म्हणाले. उपमुख्य लेखापरीक्षक असे मूळ पद असलेल्या महावीर पाटणी यांना देण्यात आलेले धनादेश वाटपाचे अधिकार  काढून त्यांना मूळ पदावर नियुक्ती द्यावी, असे आदेश स्थायी समितीने दिले होते. परंतु आयुक्तांनी पाटणी यांचा मूळ पदभार काढून घेत अतिरिक्त पदभार कायम ठेवला. सभेत अफसर खान, राजू शिंदे यांनी पाटणी यांचा मुद्दा उपस्थित केला. सोमवारी पाटणीप्रकरणी बैठक घेतली जाणार होती. काय झाले, अशी विचारणा करण्यात आली. या सगळ्यावर आयुक्तांनी महापौरांची परवानगी घेत खुलासा सादर करीत आपली बाजू मांडली.

आयुक्त डॉ. विनायक म्हणाले, ९ महिन्यांपासून शहरासाठी दिवस-रात्र एक करून काम केले. मी आलो होतो, तेव्हा रस्त्यां-रस्त्यांवर कचरा होता. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी काम केले, स्मार्ट सिटी बस दाखल झाली. तरीही कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तेदेखील सार्वजनिक व्यासपाठीवर, असे आयुक्त म्हणाले. 

काय म्हणाले मनपा आयुक्त
- शहरात आल्यानंतर कचरा प्रश्न पाहून रात्री झोप येत नव्हती.
- कचरा प्रश्न सोडविण्यासाठी मिशन...मिशन...म्हणून मागे लागले.
- कचरा प्रश्न सोडविण्यासाठी हात जोडून एजन्सींना आणले.
- वर्ग-२ ची ४०, तर वर्ग-३ ची ३९७ पदे रिक्त, तरीही सक्षमपणे काम.
- चार ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया होईल, त्याला चार नारेगाव तयार केले, कसे म्हणता.
- औरंगाबादचे रहिवासी असूनही अनेक अधिकारी इथे येण्यास तयार नाहीत.
- स्मार्ट सिटीतून शहराची मान उंचावण्याचा प्रयत्न केला. 
- ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ संकल्पना वाढत असताना त्यास आग लावली.
- एखाद्या कामासाठी येथे १०० पटीने परिश्रम करावे लागतात.
- समांतरसाठी प्रयत्न केले. तो आता शेवटच्या टप्प्यावर आहे. 
- कोणती कामे घ्यावी ते शासनाने ठरविले पाहिजे.
- वॉर्डांतून १०० टक्के कर गोळा होईल, ही जबाबदारी नगरसेवकांनी पार पाडावी.

तर पाच दिवसांत कचरा प्रश्न निकाली
सगळे पदाधिकारी, नगरसेवक पाठीशी राहिले तर केवळ पाच दिवसांतच कचऱ्याचा प्रश्न सोडविणे शक्य असल्याचे म्हणत मनपा आयुक्त डॉ. विनायक यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. ‘प्रोफेशनली’ काम करावे लागेल. प्रशासनामुळे कचऱ्याचा डीपीआर वाढला, याच्याशी मी सहमत नाही, असेही ते म्हणाले.

कोणी येत नाही, मी आलो
औरंगाबादेत माझी नववी पोस्टिंग आहे. १८ वर्षांच्या सेवेत मराठवाड्यात सर्वाधिक काम केले. प्रत्येक ठिकाणी प्रश्न आहेत. परंतु काम करूनही काहीच केले नाही, असे दाखविले जाते. त्यामुळे येथे कोणी यायला तयार होत नाही. मलाही विचारणा केली होती, तुम्ही औरंगाबादला जाणार का? मी आलो. तेही कचराकोंडीच्या वेळी.  त्यामुळे येथील मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मतही डॉ. विनायक यांनी व्यक्त केले.

आयुक्त म्हणून मला अधिकार
कोणत्या कर्मचाऱ्याला कोणते काम द्यायचे, हा मनपा आयुक्तांचा अधिकार आहे. ज्यांच्यात ज्या कामाची क्षमता आहे त्यांना ते काम दिले पाहिजे. हे अधिकार आयुक्तांचे नसावे असे वाटत असेल तर हे धोकादायक आहे, असे म्हणत आयुक्तांनी पाटणी यांच्या विषयांवर उत्तर देण्याचे टाळले.

तुम्ही धोरण ठरवा
सर्वसाधारण सभेत धोरणात्मक विषयांवर चर्चा केली पाहिजे. परंतु प्रत्येक जण केवळ स्वत:च्या वॉर्डातील प्रश्नच मांडतो. शहराच्या योजनांत कशा सुधारणा होतील, यादृष्टीने चर्चा करून धोरण ठरविले पाहिजे, असे आयुक्त म्हणाले. 

राजू वैद्य यांची अनुपस्थिती
आयुक्तांच्या खुलाशानंतर नगरसेवकांनी आपली मते मांडली.  राजेंद्र जंजाळ म्हणाले, हे पत्र स्थायी समितीचे होते, त्याचा खुलासा सभागृहात झाला. परंतु आयुक्तांना ताकद दिली पाहिजे. सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. राजू शिंदे म्हणाले, ज्यांनी हे पत्र दिले ते सभापती राजू वैद्य हे अनुपस्थित आहेत. आयुक्त हे कार्यक्षम आहेत.

दहा मिनिटे सभा तहकूब
सभागृहातील नगरसेवकांनी आयुक्तांना अकार्यक्षम म्हटलेले नाही. व्यक्तिगत पातळीवर असे कुणी म्हटले असेल, असा मुद्दा राजगौरव वानखेडे यांनी मांडला. त्यावर अफसर खान यांनी आक्षेप घेतला. यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली. सभा सुरू झाल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, संपूर्ण सभा आयुक्तांच्या पाठीशी आहे, असे स्पष्ट केले. 

महापौरांविरोधात घोषणा
सभेत विरोधी पक्षनेते जमीर कादरी यांना बोलण्यापासून महापौरांनी थांबविले. तेव्हा कादरी आणि ‘एमआयएम’चे नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. सभागृहाबाहेर त्यांनी महापौरांविरोधात घोषणाबाजी केली.

ठेकेदारांचा महापौरांना घेराव
प्रलंबित बिले मिळण्याच्या मागणीसाठी ठेकेदारांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. महापौर सभागृहात येताच ठेके दारांनी त्यांना घेराव घालून प्रलंबित बिले देण्याची मागणी केली. याविषयी आयुक्तांशी चर्चा केली जाईल, असे घोडेले म्हणाले.

Web Title: 'My courage is over'; Emotions expressed by the Municipal Commissioner of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.