नांदेड : दुसरे लग्न करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी पतीने घराबाहेर काढलेल्या वृद्ध महिलेने वयाच्या सत्तरीत पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली़ या वृद्धेला दरमहा एक हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ दुसऱ्या विवाहानंतरही पती एक ना एक दिवस नांदवायला घेऊन जाईल, म्हणून ही महिला आस लावून एक- एक दिवस काढत होती़; पण पतीला काही तिची दया आली नाही. अखेर वृद्धावस्थेत आधार नसल्याने नाइलाजाने तिला न्यायालयाची पायरी चढावी लागली़
मौजे एकदरा येथील इंद्राबाई (नाव बदलले आहे) यांचे ५५ वर्षांपूर्वी नारायणराव आर्सुळे (नाव बदलले आहे) यांच्याशी लग्न झाले़ लग्नानंतर या दाम्पत्याला तीन मुली व एक मुलगा झाला़ यथावकाश सर्वांचे विवाह झाले़ आता मोठा परिवार आहे़ पण पतीने ३५ वर्षांपूर्वी दुसरे लग्न करायचे आहे, त्यासाठी फारकत दे, असे म्हणून इंद्राबाई यांना घराबाहेर हाकलले; परंतु इंद्राबाई यांनी हिंमत सोडली नाही़ एक ना एक दिवस पती नांदवायला घेऊन जाईल, या आशेने त्यांनी मुली आणि मुलाकडे तब्बल ३५ वर्षे काढली. परंतु नारायणराव यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही़ त्यामुळे वृद्धावस्थेत पोटगीसाठी इंद्राबाई यांना २०१८ मध्ये न्यायालयाची पायरी चढावी लागली़
न्यायालयात नारायणराव यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, नारायणरावांचे वय ७५ वर्र्षे आहे़ त्यांना आता कोणताही कामधंदा येत नाही़ त्यामुळे पोटगीचा अर्ज फेटाळून लावावा़ तर इंद्राबाई यांच्या वतीने अॅड़ मंगल पाटील यांनी युक्तिवाद केला की, पतीचे वय जास्त म्हणून पोटगी फेटाळता येत नाही़ तसेच पतीने पत्नीचे पालनपोषण करणे हे नैतिक कर्तव्य आहे. तसेच हा कायदा सामाजिक असल्याचेही त्यांनी न्यायालयास सांगितले़ त्यानंतर न्यायालयाने नारायणरावांनी पत्नी इंद्राबाई यांना दरमहा एक हजार रुपये पोटगी व दाव्याचा खर्च म्हणून दीड हजार रुपये द्यावेत, असे आदेश दिले़