- स. सो. खंडाळकर
तूकाराम पांचाळ हे प्रारंभापासूनच शरद पवार यांचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. त्यांच्याशी निष्ठावान राहण्याचे फळही त्यांना त्या काळात मिळाले होते. तत्कालीन राज्य दुय्यम सेवा मंडळाचे सदस्यपद शरद पवार यांच्यामुळे त्यांना भूषविता आले होते. प्रारंभी त्यांनी युवक क्रांती दलात कार्य केले. नामांतर लढ्याच्या अनेक आठवणी त्यांच्या गाठीशी आहेत.
स.भु. मैदानावरची बैठक...नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. त्यांनी सांगितले, अगदी सुरुवातीला स.भु.च्या मैदानावर आम्ही बैठक घेतली होती. त्यात मानवेंद्र काचोळे, ज्ञानोबा मुंडे, श्रीरंग वारे, प्रकाश देशमुख ही मंडळी होती. त्या काळात वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या जागा कमी करण्यात आल्या होत्या. त्या वाढवाव्यात ही मागणी होती. मग बैठकीला वैद्यकीय व अभियांत्रिकीची थोडीथोडकीच मुले उपस्थित राहिली. विविध मागण्यांचा समावेश करून व्यापक आंदोलन करावे या हेतूने व्यापक बैठक आयोजित केली. बेनॉर योजना लागू करा, शारीरिक शिक्षण सक्तीचे करा, शिष्यवृत्तीत वाढ करा, शेतीमालाला किफायतशीर भाव द्या, यासह विविध मागण्यांसाठी विविध महाविद्यालयांच्या विद्यापीठ प्रतिनिधींसह युवक काँग्रेस, एसएफआय, दलित युवक आघाडी, एनएसयूआय, पुरोगामी युवक संघटना, दलित पँथर, युवक क्रांती दल, अशा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याच वेळी रामनाथ गायकवाड व अनिल गोंडाणे आदींनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे हे ५० वे वर्ष असल्याने मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची मागणी करणे संयुक्तिक ठरेल, असे सुचविले. त्यामुळे तीही मागणी समाविष्ट करून पायी आम्ही विद्यापीठाकडे निघालो.
इकडे गंगाधर गाडे, रतनकुमार पंडागळे, दौलत खरात आदींच्या नेतृत्वाखालीही मोठा मोर्चा निघाला होता. त्यात मिलिंदचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याच दिवशी विद्यापीठात किशनराव देशमुख, वसंत काळे, राजाराम राठोड यांच्या प्रयत्नाने नामांतराचा ठराव संमत झाला होता. ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांती चौकातील सत्याग्रहात सहभागी झालो होतो. त्यानंतर मुंबईच्या सत्याग्रहात मला पहिली अटक झाली. तीन वर्षे मी मुंबईतच युनियनचे काम करीत राहिलो. नंतर औरंगाबादला आलो. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या समाजवादी काँग्रेसमध्ये मी काम करीत होतो. दुसऱ्यांदा शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी नामांतर करण्याचे मनावर घेतले. नामांतर विरोधक गोविंदभाई श्रॉफ, दिनकर बोरीकर, ना. वि. देशपांडे आदींशी त्या काळात मी चर्चा करीत होतो. गोविंदभार्इंच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुंबईला गेले. भाईजींनी त्यांचे म्हणणे मांडले. मराठवाडा नाव कायम ठेवून व नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा तोडगा काढण्यात आला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला समन्वयाची भूमिका पार पाडता आली, याचे समाधान वाटते, असे तुकाराम पांचाळ यांनी नम्रपणे नमूद केले.