दोस्ती का नाम जिंदगी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:14 AM2018-01-07T00:14:14+5:302018-01-07T00:14:20+5:30
व्यसनाच्या आहारी गेलेल्या मित्राचा बिघडलेला संसार सुखाचा करून वर्गमित्रांनी एक आदर्श निर्माण केला. एवढेच नव्हे तर आपल्या मित्राला निर्व्यसनी करून सर्वांनी वर्गणी जमा केली व त्यास व्यवसायही सुरू करून दिला. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनानिमित्त हा सुखाचा ‘क्षण’ आला.
रवींद्र अजमेरा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वासडी : व्यसनाच्या आहारी गेलेल्या मित्राचा बिघडलेला संसार सुखाचा करून वर्गमित्रांनी एक आदर्श निर्माण केला. एवढेच नव्हे तर आपल्या मित्राला निर्व्यसनी करून सर्वांनी वर्गणी जमा केली व त्यास व्यवसायही सुरू करून दिला. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनानिमित्त हा सुखाचा ‘क्षण’ आला.
वासडी येथील जि. प. प्रशालेतील १९९४ मध्ये दहावी वर्गात सोबत असलेल्या वर्गमित्रांनी मागील दोन वर्षांपासून स्नेहमिलनाचा कार्यक्रम सुरू केला आहे.
या वर्गातील ७० विद्यार्थी प्रत्येक वर्षी एकत्र येऊन प्रत्येकाचे सुख दु:ख विचारून सगळे मिळून मदतही करतात. यातूनच त्यांचा वर्गमित्र संजय वाघ हा दारूच्या आहारी गेल्याने त्याच्या संसाराला ‘नजर’ लागली. घरात नवरा-बायकोत भांडणे होऊ लागली. यामुळे इतर मित्र चिंतित झाले. नंतर सर्व मित्रांनी आधार देऊन संजयची संसारवेल पुन्हा फुलविली.
यावर्षी भगवान बाबा मंदिरावर हस्ता गावच्या विद्यार्थ्यांकडून या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला १९९४च्या बॅचचे सर्व विद्यार्थी व वासडी शाळेचे शिक्षक ए. व्ही. आरसूल, डी. पी. सुरडकर उपस्थित होते.
वासडी येथील सरपंच राहुल पाटणी, मेहेगावचे सरपंच पांडुरंग घुगे, हस्ता गावचे माजी सरपंच मनोहर नीळ यांनी हजेरी लावून या उपक्रमाची प्रशंसा केली.
अचानक काहीही संकट आले तर एकमेकांना मदत करायची, असा निर्णय या सर्व मित्रांनी घेतल्याने स्नेहमिलनात ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण झाले होते. यामुळे खुदगर्ज चित्रपटातील ‘दोस्ती का नाम जिंदगी...जिंदगी का नाम दोस्ती’ या गाण्याची आठवण मित्रांना झाली.
माझ्या नवºयाने सोडलिया दारू...
सर्व वर्गमित्रांनी स्नेहमिलनात संजयचा संसार सुखाचा करण्याचा संकल्प केला व तो ध्यासालाही नेला. संजयनेही मित्रांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दारू सोडली. यानंतर त्यास हॉटेलवर कामाला लावले. तो मागील एक वर्षापासून व्यसनाच्या दूर राहिला म्हणून यंदाच्या स्नेहमिलनात त्याचा गुरुजनांच्या हस्ते सत्कार करून हॉटेल व्यवसाय सुरू करून देण्याचा निर्धार करण्यात आला. १ जानेवारीला नववर्षदिनी हॉटेलही सुरु झाली. सर्व वर्गमित्रांनी संसार सुखाचा केल्याने संजयच्या वडिलांनी व पत्नीने सर्वांचे आभार मानले. आपल्या नवºयाने दारु सोडल्याचे कळताच बायकोलाही आनंदाश्रू आवरणे कठीण झाले.