औरंगाबाद जिल्ह्यातील १२ हजार मतदारांची नावे वगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 04:27 PM2018-11-02T16:27:04+5:302018-11-02T16:28:45+5:30
मतदार यादीमध्ये असलेली दुबार नावे, चुकीचा पत्ता, यादीमध्ये फोटो नसणे, नाव असणे, ओळखपत्र नसलेल्या मतदारांची नावेही मतदार यादीतून वगळली आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यातील आॅनलाईन व आॅफलाईन प्रकारामध्ये तब्बल १२ हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. मतदार यादीमध्ये असलेली दुबार नावे, चुकीचा पत्ता, यादीमध्ये फोटो नसणे, नाव असणे, ओळखपत्र नसलेल्या मतदारांची नावेही मतदार यादीतून वगळली आहेत. यादीतून सर्वाधिक ४ हजार ३९१ नावे सिल्लोड तालुक्यातील आहेत, तर सर्वात कमी १५० नावे वैजापूर तालुक्यातील आहेत. गंगापूर, पैठण आणि कन्नड तालुक्यांमध्येही वगळण्यात आलेल्या नावांची संख्या प्रत्येकी एक हजारांपेक्षा अधिक आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पुढच्यावर्षी सुरूहोणे शक्य आहे. त्यासाठी राज्यभर निवडणूक विभाग मतदार नोंदणीच्या कामात गुंतला आहे. १ जानेवारी २०१९ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याचे नियोजनाअंती जिल्ह्यात नवमतदारांची नावनोंदणी सुरूआहे. या अंतर्गत मयत झालेल्या तसेच जिल्हा सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणूक विभागाकडे आॅनलाईन तसेच आॅफलाईन प्रक्रियेमधून साडेबारा हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात १ जानेवारी २०१९ या अर्हतेवर आधारित छायाचित्र मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेले असून, त्यानुसार जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणे तसेच स्थलांतर करण्याची प्रक्रिया ३१ आॅक्टोबरपर्यंत तूर्तास थांबली.
मतदारसंघनिहाय वगळलेली नावे
मतदारसंघ वगळलेली नावे
औरंगाबाद (मध्य) ८३४
औरंगाबाद (पश्चिम) ३३५
औरंगाबाद (पूर्व) १३५
सिल्लोड ४३९१
कन्नड २००७
फुलंब्री ७२९
पैठण २८६०
गंगापूर ११०७
वैजापूर १५०