नांदेड : राज्यभर गाजलेल्या नांदेड पोलीस भरती प्रक्रिया प्रकरणी अप्पर पोलीस महासंचालक संदीप विषनोई यांनी यासाठीची घेण्यात आलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचे आज आदेश दिले. आता याप्रकरणी पुन्हा लेखी परीक्षा घेण्यात येणार असून आज संध्याकाळी नवीन तारीख जाहीर करण्यात येईल. यासोबतच परीक्षा घोटाळ्यातील मुख्यधागा असलेली एसएसजी सॉफ्टवेअर सोल्युशन या कंपनीसही बाद करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा पोलीस भरतीत झालेल्या लेखी परीक्षेत रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघड आला होता. याप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल आहे. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात आता अप्पर पोलीस महासंचालक संदीप विषनोई यांनी ही लेखी परीक्षा रद्द करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. या परीक्षेसाठी पुन्हा लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळी परीक्षेची नवीन तारीख घोषित करण्यात येईल. घोटाळ्यातील मुख्य धागा असलेली एसएसजी सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीस पुन्हा होणाऱ्या लेखी परीक्षेपासून दूर ठेवत तिला संपूर्ण प्रक्रियेसाठी बाद करण्यात आले आहे .
दोषी परीक्षार्थी बादपरीक्षा घोटाळा प्रकरणात दोषी असलेल्या सर्व १३ परीक्षार्थीना नव्याने होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी बाद करण्यात आले आहे. यासोबतच त्यांही उमेदवारीही रद्द करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण नांदेड जिल्ह्यात ६९ पोलीस शिपाई पदासाठी १२ मार्च २०१८ ते १ एप्रिल २०१८ या कालावधीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी पेपर जाणीवपूर्वक कोरे सोडले. या पेपर तपासणीच्यावेळी ओएमआर पद्धतीच्या पत्रिका भरती प्रक्रियेत संगणकीय विभागात काम करणाऱ्या आॅपरेटर्समार्फत उमेदवारांच्या रिकाम्या उत्तरपत्रिकेवर योग्य उत्तरे भरुन जवळपास ९० गुण प्राप्त केले.
या भरती प्रक्रियेतील घोटाळ्यासाठी औरंगाबादचे आयआरबी विभागाचे पोकॉ नामदेव ढाकणे, राज्य राखीव दलाच्या जालना येथील ग्रूप ३ चे पोकॉ शुक्राचार्य बबन टेकाळे, शेख आगा, सांगलीच्या एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष अवधूत, स्वप्निल दिलीप साळुंके, ओएमआर आॅपरेटर प्रवीण भाटकर आणि दिनेश गजभारे यांनी सहकार्य केले तर भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या ओमकार संजय गुरव, कृष्ण काशिनाथ जाधव, शिवाजी श्रीकृष्ण चेके, कैलास काठोडे, आकाश दिलीप वाघमारे, सलीम मोहमद शेख, समाधान सुखदेव मस्के, किरणअप्पा मस्के, सुमित दिनकर शिंदे, मुकीद मकसुद अब्दुल, हनुमान मदन भिसाडे, रामदास माधवराव भालेराव आणि संतोष माधवराव तनपुरे यांनी भरती होण्यासाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपये देण्याचे कबूल केले आणि खोटे दस्तावेज तयार करुन मूळ दस्तावेजाजागी ते खरे म्हणून वापरले. यात शासनाची फसवणूक केली.
असा झाला घोटाळा उघड या परीक्षेत पोलीस भरतीसाठी परीक्षा दिलेल्या समाधान सुखदेव मस्के आणि किरणअप्पा मस्के या दोघांना समान गुण मिळाले. हे दोघेही राहणार देऊळगाव राजा तालुक्यातील होते. या दोघांसह देऊळगाव राजा येथील अन्य पाच जणही लेखी परीक्षेत ९० गुणांपर्यंत पोहोचले होते. एकाच गावातील सर्वांना जवळपास सारखे गुण मिळणे ही बाब पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी लेखी परीक्षेदरम्यान छायाचित्रण तपासले. या छायाचित्रणात सदर परीक्षार्थी उत्तरे सोडविण्याऐवजी इतरत्र पाहत निवांत होते. परीक्षेचा कोणताही ताण त्यांच्यावर नव्हता. हे छायाचित्रण तपासल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या. त्यात उत्तरे लिहिल्याचे आढळले होते. त्यामुळे एकूणच हा प्रकार संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले. भरती प्रक्रियेदरम्यान लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिका पोलिसांनी परत घेतल्या होत्या. त्या प्रश्नपत्रिकेवर आकडेमोड करण्यासाठी काही जागा सोडली होती. त्या जागेवर या उमेदवारांनी कोणतीही आकडेमोड केली नसल्याचेही तपासात पुढे आले. अधिक चौकशीत या भरती प्रक्रियेत संगणकीय विभाग सांभाळणाऱ्या एसएसडी सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह ओएमआर आॅपरेटर आणि पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे उघड झाले.
पाच वर्षांपासून ‘एसएसजी’ नांदेडातनांदेड पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी मागील पाच वर्षांपासून सांगलीची एसएसजी सॉफ्टवेअर्स कंपनी लेखी परीक्षा घेत आहे. त्यामुळे मागील चार वर्षांतील भरती प्रक्रियाही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.