शेतकरी कुटुंबाची नायब तहसीलदारास शिवीगाळ करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 07:25 PM2020-02-03T19:25:16+5:302020-02-03T19:26:03+5:30
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खुलताबाद : नवीन विहिरीचे ब्लास्टिंगचे काम महसूल विभागाने पंचनामा करून बंद केल्याचा राग अनावर होऊन एका शेतकऱ्याने बायको व दोन मुलासंह तहसील कार्यालयात येऊन नायब तहसीलदार व कर्मचारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद करून खुलताबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. नायब तहसीलदार अशोक कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुलताबाद तालुक्यातील शूलिभंजन येथील प्रभाकर दामू वरपे यांनी गट नंबर २६ मध्ये शेती आहे. या शेतात नवीन विहिरीचे काम सुरू असल्याने सदर विहिरीत ब्लास्टिंग घेत आहे. सदरील ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांवर दगडे व हादरे बसत असल्याची तक्रार तहसीलदार खुलताबाद व उपविभागीय अधिकारी कन्नड यांच्याकडे भीमशक्ती संघटनेच्या तालुकाध्यक्षा मंगलबाई बनकर व भाऊ विठ्ठल दामू वरपे यांनी ९ व १५ फेब्रुवारी रोजी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, कन्नड यांनी खुलताबादचे तलाठी डी.पी. गोरे यांना अहवाल सादर करण्याचे लेखी कळविले होते.
सोमवारी (दि.३) प्रभाकर वरपे त्यांची बायको व मुलगा यांनी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार अशोक कापसे व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तहसील कार्यालयात सुरू असलेल्या या राड्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात येऊन संबंधित शेतकऱ्यास पोलीस ठाण्यात नेण्यात आले. खुलताबाद तहसील कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांनी कामकाज बंद करून पोलीस ठाण्यात जमा होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आर.एल. चंदेल व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, नायब तहसीलदार अशोक कापसे यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रभाकर वरपे, त्याची बायको व दोन मुले यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत करीत आहेत.
शनिवारीही केली होती अरेरावी
तलाठी डी.पी. गोरे यांनी शनिवारी (दि.१) शूलिभंजन येथील प्रभाकर दामू वरपे यांच्या ब्लास्टिंग सुरू असलेल्या विहिरीचा पंचनामा केला होता. दरम्यान प्रभाकर वरपे याने बायको व मुलासह शनिवारी दुपारीच तहसील कार्यालयात जाऊन अव्वल कारकून राऊत व लिपिक पांढरे यांच्याशी अरेरावी करून शिवीगाळ केली होती. यावेळी नायब तहसीलदार अशोक कापसे यांनी त्यांची समजूत घालून परत पाठवले होते.
न्याय देण्याची मागणी
शेतकरी प्रभाकर वरपे म्हणाले की, आम्ही न्याय मागण्यासाठी तहसील कार्यालयात गेलो असता उडवा उडवीची उत्तरे महसूलचे अधिकारी देत होते. मला व बायकोस शिवीगाळ करून लोटालोट केली असून याप्रकरणी न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.