बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:50 PM2019-05-30T23:50:04+5:302019-05-30T23:50:46+5:30
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमार्फत आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्यामुळे धास्तावलेल्या बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर दिवसभर धरणे आंदोलन दिले. मात्र, त्याठिकाणी एकही सक्षम अधिकारी नसल्यामुळे दिवसभर बिनापाण्याचे बसून राहावे लागल्याचा प्रकार गुरुवारी घडला.
औरंगाबाद : प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमार्फत आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्यामुळे धास्तावलेल्या बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर दिवसभर धरणे आंदोलन दिले. मात्र, त्याठिकाणी एकही सक्षम अधिकारी नसल्यामुळे दिवसभर बिनापाण्याचे बसून राहावे लागल्याचा प्रकार गुरुवारी घडला.
पवित्र पोर्टलमार्फत शाळांमधील शिक्षक नोकरभरती करण्यात येत आहे. या पवित्रमध्ये मागील काही दिवसांपासून सतत तांत्रिक बिघाड होत आहे. यासाठी अनेक वेळा बेरोजगार संघटनांनी तक्रारी करूनही अर्ज दुरुस्ती झालेली नाही. अर्ज करण्यासाठी शुक्रवारी शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी ज्यांना आॅनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्या सर्व उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात दुरुस्तीसाठी अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अर्जातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, नाशिक येथून शेकडो बेरोजगार युवकांनी औरंगाबादच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. या कार्यालयात अर्ज दुरुस्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. हजारो विद्यार्थी कार्यालयाच्या परिसरात अर्ज घेऊन आले होते. मात्र, त्यांना दिवसभर कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी दुपारपासून शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांच्या कार्यालयाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी या कार्यालयात शिक्षण उपसंचालकासह सहायक उपसंचालक इतर अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे बेरोजगारांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. रात्री ८ वाजेपर्यंतही उमेदवार शिक्षण उपसंचालक कार्यालयात थांबलेले होते. शुक्रवारी शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड घबराट पसरलेली आहे. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या शिक्षक नोकरभरतीमध्ये संधी हुकण्याची भीती या उमेदवारांमध्ये दिसून आली. याविषयी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
चौकट,
महिलांना झाला प्रचंड त्रास
शिक्षण उपसंचालक कार्यालयात शेकडो महिला उमेदवार आपल्या पाल्यांसह अर्ज दुरुस्तीसाठी आल्या होत्या. या कार्यालयात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे अनेकांना दूरपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागली. दिवसभर कार्यालयाबाहेर बसल्यामुळे उन्हाच्या झळा, गर्मी यामुळे महिलांना अधिक त्रास झाला. यात नांदेडवरून आलेल्या दोन मुस्लिम महिलांना उपवास होता. उन्हामध्ये त्रास सहन करीत बसावे लागल्यामुळे या महिलांना अक्षरश: रडू कोसळले. या आहेत पोर्टलवरील तांत्रिक चुका
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना अनेक उमेदवारांचे लॉगिन होत नाही. लॉगिन झाल्यानंतर प्रेफरन्स चुकीचा दाखवला जातो. पासवर्ड मिसमॅच दाखविण्यात येतो. प्रेफरन्स दिल्यास दुसऱ्याच शाळेला दाखविण्यात येतात. ज्या शाळेत एकही रिक्त पद नाही. या सगळ्या चुका घेऊन बेरोजगार उमेदवार दुरुस्तीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल झाले होते.