नवीन बीड बायपासला डिसेंबरअखेरपर्यंतचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 06:32 PM2020-01-28T18:32:36+5:302020-01-28T18:35:49+5:30
१९० किलोमीटर लांबीच्या चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
औरंगाबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशी ते औरंगाबाद (टप्पा क्रमांक दोन) या जवळपास १९० किलोमीटर लांबीच्या चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हे काम मार्च २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.
तथापि, झाल्टा फाट्यापासून निघालेल्या नवीन बीड बायपास ते कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नवीन बीड बायपासच्या कामासाठी येणारे अडथळे आता जवळपास सर्वच निकाली निघाले असल्यामुळे हा बायपास डिसेंबर २०२० पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज होईल, या दिशेने कामाला गती देण्यात आली आहे. मध्यंतरी राज्य राखीव पोलीस बलाकडून जमीन हस्तांतराचे काम रखडले होते. आता या कार्यालयाकडून जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे या कामाने गती घेतली आहे.
बहुप्रतीक्षित धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर ते येडशी या १०० किलोमीटरच्या टप्प्याचे संपूर्ण काम पूर्ण होऊन रस्त्याचे लोकार्पणही झाले आहे. टप्पा क्रमांक दोनच्या येडशी ते औरंगाबाद या महामार्गाच्या चौपदीरकरणाचे १९० किलोमीटरच्या कामासाठी जवळपास भूसंपादनाचे सर्व अडथळे दूर झाले असून आता अवघ्या दोन महिन्यांतच हे काम पूर्ण करण्यात येईल. सध्या या रस्त्यावरून वाहतूकही सुरू आहे. या रस्त्यावर तीन ठिकाणी ‘आयआरबी’ या कंत्राटदार कंपनीने टोलवसुलीही सुरू केली आहे. या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर एवढा असेल, असे या रस्त्याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद ते बीडपर्यंत अवघ्या एका तासाच्या, तर सोलापूरपर्यंत तीन तासांत पोहोचणे शक्य होईल. हा महामार्ग एक महत्त्वाचा टप्पा गाठणार असून, उत्तर भारताकडील उद्योग क्षेत्र आणि दक्षिणेकडील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला जोडणारा हा प्रमुख मार्ग असेल.
औरंगाबाद-धुळे टप्पा प्रगतिपथावर
या राष्ट्रीय महामार्गावरील औरंगाबादपासून धुळे येथपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न आहेत. या रस्त्यावरील काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी आहेत, त्याही लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील.
बीड बायपासच्या कामाचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. नवीन बीड बायपास ते कन्नड घाटापर्यंतचे काम पूर्ण करण्याची मार्च २०२१ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असली, तरी बीड बायपासचे काम साधारणपणे डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकते. - अजय गाडेकर, प्रकल्प संचालक