तीन दिवसांत औरंगाबाद शहराला देणार नवीन पोलीस आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:21 AM2018-05-24T00:21:43+5:302018-05-24T00:23:09+5:30
११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तीन दिवसांत शहराला नवीन पोलीस आयुक्त देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी रात्री मुंबईत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तीन दिवसांत शहराला नवीन पोलीस आयुक्त देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी रात्री मुंबईत दिली.
औरंगाबादेत झालेल्या दंगलीत दोन जणांचा बळी गेला आणि पोलिसांचा गोळीबार आणि दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत दोनशेहून अधिक नागरिक जखमी झाले. या दंगलीत अनेकांची वाहने आणि दुकाने जाळण्यात आली. शेकडो वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात नमूद केला आहे. दंगल करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांसह ६५ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अन्य दंगलखोरांची ओळख पटवून त्यांचे अटकसत्र पोलिसांकडून सुरूच आहे. शिवाय या दंगलीत काही पोलीस पक्षपाती वागल्याचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यांनी दंगलीच्या विविध व्हिडिओ क्लीप मुख्यमंत्र्यांना दिल्या. शिवाय दंगलीची चौकशी करण्याची मागणी केली.
नुकसानभरपाई देण्याचीही तयारी
शिष्टमंडळासोबत चर्चा करताना दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ही चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांच्यामार्फत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नुकसान झालेल्या लोकांना नुकसानभरपाई देण्याची तयारीही त्यांनी दर्शविल्याचे शिष्टमंडळातील सदस्य आ.जलील यांनी सांगितले.
दोन महिन्यांपासून आयुक्तपद रिक्त
४शहराचे पोलीस आयुक्तपद दोन महिन्यांपासून रिक्त आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, तीन दिवसांत नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मिटमिटा दंगलीची अद्याप चौकशी नाही
मार्च महिन्यात मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली होती. गृह विभागाचे अप्पर सचिव आणि पोलीस महासंचालक ही चौकशी करण्यासाठी औरंगाबादेत येणार होते. या घोषणेची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. असे असताना शहरात नुकत्याच झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन पाळले जाईल का याविषयी उत्सुकता आहे.