निखील गुप्ता औरंगाबाद शहराचे नवे पोलीस आयुक्त; चिरंजीव प्रसाद यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 05:25 PM2020-09-03T17:25:01+5:302020-09-03T18:01:57+5:30
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. आज औरंगाबाद आणि नागपूरचे पोलीस अधिकारी बदलण्यात आले आहेत.
मुंबई : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. आज औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली करण्यात आली. तर त्यांच्याजागी निखील गुप्ता यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
निखिल गुप्ता हे केंद्रीय नियुक्तीवरून राज्यात परतले आहेत. प्रसाद यांची बदली नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरिक्षक पदी करण्यात आली आहे. तर तिसरे अधिकारी रविंद्र कुमार सिंघल यांची बदली नियंत्रक वैद्यमापन शास्त्र, मुंबई येथे करण्यात आली आहे. येथे ते विशेष पोलीस महानिरीक्षक समकक्ष पदावर काम पाहणार आहेत. सिंघल हे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते.
तर के एम एम प्रसन्ना यांची नागपूर नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरिक्षक पदावरून औरंगाबादच्या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. बुधवारी राज्यातील बहुतांश अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
गुप्ता १५ वर्षानंतर औरंगाबादेत
गुप्ता हे २००३ ते २००५ या कालावधीत शहरात पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. औरंगाबादमधून ते सयुंक्त राष्ट्र संघटनेच्या शांतीसेनेत प्रतिनियुक्तीवर गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. यानंतर ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. सध्या ते हैदराबाद येथील आय पी एस ट्रेनिंग सेंटर येथे कार्यरत होते. प्रतिनियुक्तीचा पाच वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यावर ते महाराष्ट्र केडर मध्ये परत आले. आज १५ वर्षानंतर गुप्ता औरंगाबादला पोलीस आयुक्तपदी बदली झाली.
राज्य गुप्त वार्ता विभागाचे प्रमुख रश्मी शुक्ला व अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ) रजनीश सेठ यांना अनुक्रमे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व नागरी संरक्षण विभागात पदोन्नती देण्यात आली आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदी बीपीन कुमार सिह यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी तर सदानंद दाते यांची मीरा भाईदरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी व शुक्रवारी आयजी, अप्पर आयुक्त व अधीक्षकाच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात येतील, असे सूत्राकडून सांगण्यात आले होते.
आघाडी सरकारमधील नेते आणि पोलीस महासंचालक यांच्यात एक वाक्यता नसल्याने बदल्या लांबणीवर पडल्याचे वृत्त सर्वप्रथम 'लोकमत'ने दिले होते. अखेर गणेशोत्सवनंतर त्यावर तोडगा काढण्यात सरकारला यश आले.
नवी मुंबईचे आयुक्तपदी एसीबीचे प्रभारी बिपीन कुमार सिह यांची नियुक्ती करण्यात आली असून तेथील संजयकुमार यांची पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण व खास पथके विभागात बदली करण्यात आली. तर रजनीश सेठ यांची एसीबीचे प्रमुख बनविण्यात आले आहे. त्याचा कायदा व सुव्यवस्था विभागाचा पदभार राजेंद्र सिह यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त प शुक्ला यांच्या जागी एसीबीतील अपर महासंचालक आशुतोष डुबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या जागी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख विनयकुमार चोबे यांची बदली करण्यात आली आहे.
सुमारे एक वर्षांपूर्वी घोषणा केलेल्या मीरा -भाईंदरच्या आयुक्तपदी अखेर सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. एसआयडीतील सहआयुक्त अमितेशकुमार यांची पदोन्नतीवर नागपूरच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तेथील आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची राज्य वाहतुक महामार्गच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली आहे. तेथील अप्पर महासंचालक विनय कारगावकर यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. रेल्वेतील अप्पर महासंचालक जयजीत सिह यांची एसीबीत बदली करण्यात आली आहे.