सिल्लोड : शहरातील भोकरदन रोडवर शॉर्टसर्किटमुळे आग लागून नऊ दुकाने जळून खाक झाली. यात अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली. दीड तासाने ही आग आटोक्यात आली. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान शहरातील भोकरदन रोडवरील गुजरात ट्रेडिंग कंपनी या दुकानात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण करीत आजूबाजूच्या विविध नऊ दुकानांना कवेत घेतले. दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेचे तीन व खासगी तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत नऊ दुकाने भस्मसात झाली होती. या आगीत शेख रज्जाक शेख सुभान यांचे स्टार वेल्डिंग वर्क शॉपचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. शेख उमर यांच्या जनता बकरा मटण शॉपचे दहा हजार रुपये, शेख कैसर शेख रऊफ यांचे भारत फर्निचरचे ३० हजार, वाजेदखा आलमखा पठाण यांचे रॉयल स्टील फर्निचरचे ३० हजार रुपये, शेख अफसर शेख भिकण यांचे जनता फर्निचरचे दोन लाख रुपये, शेख मन्नान शेख युसूफ यांचे सितारा गॅस वेल्डिंगचे तीन लाख रुपये, शेख सोहेल यांचे महाराष्ट्र ऑटो कन्सल्ट, अश्रफ युसुफ कच्छी यांचे गुजरात ट्रेडिंग कंपनीचे दहा लाख रुपये, शेख सादेख यांचे सादेख ऑटो पार्ट्स ॲण्ड गॅरेज आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी मोठी मदत केली. तसेच आग लागल्यानंतर ती पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती. ती पांगविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.
फोटो कॅप्शन : सिल्लोड शहरातील भोकरदन रोड वर दुकानाला लागलेली आग.
040521\img-20210504-wa0328_1.jpg
सिल्लोड शहरातील भोकरदन रोड वर दुकानाला लागलेली आग.