चापानेर ग्रा.पं.वर पवार घराण्यांचा नवव्यांदा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:19+5:302021-01-19T04:07:19+5:30
चापानेर : चापानेर-बोलठेक ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांच्या गटाने सलग पाचवी पंचवार्षिक निवडणूक जिंकून ...
चापानेर : चापानेर-बोलठेक ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांच्या गटाने सलग पाचवी पंचवार्षिक निवडणूक जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले, तर त्यांच्या वडिलांच्या ताब्यात यापूर्वी २० वर्ष सत्ता होती. या एकाच घराण्याच्या ताब्यात नऊ पंचवार्षिक येण्याचा विक्रम झाला आहे.
किशोर पवार यांच्या पॅनलचे ११ पैकी दहा उमेदवार विजयी झाले आहेत. यापूर्वी पॅनलच्या वैजयंती पवार व सरिता शिंदे या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या. चापानेर ग्रामपंचायतीचे वैशिष्ट्ये म्हणजे किशोर पवार यांचे वडील नारायणराव पवार यांच्या गटाच्या ताब्यातही २० वर्षे ग्रामपंचायत होती. या एकाच घराण्याच्या हाती ही ४० वर्षांपासून सत्ता आहे, तर यंदाच्या निवडणुकीतही त्यांच्याच पॅनलला संधी मिळाली आहे. महाविकास आघाडी पॅनलचे नऊ उमेदवार पराभूत झाले. विजयी उमेदवारांमध्ये अनुराधा घुले, संजय हिरे, कल्याण पवार, कमलबाई पवार, प्रशांत भाडाईत, मनीषा राठोड, विठ्ठल सोनावणे, बाबूराव सातदिवे हे विजयी झाले. तंटामुक्त मुक्त समितीचे अध्यक्ष सुकदेव पवार यांनी विजयासाठी मेहनत घेतली. अपक्ष शोभाबाई पवार या विक्रमी मतांनी निवडून आल्या.
फ़ोटो : चापानेर ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवार.