नाथसागरावर पाहुण्या पक्ष्यांचा मुक्काम लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:15 AM2019-02-17T00:15:00+5:302019-02-17T00:15:49+5:30

वातावरणातील सकारात्मक बदल : पक्षीप्रेमींची जायकवाडी धरणावर गर्दी

 Nityaagara visitors' birds stay afloat | नाथसागरावर पाहुण्या पक्ष्यांचा मुक्काम लांबला

नाथसागरावर पाहुण्या पक्ष्यांचा मुक्काम लांबला

googlenewsNext

संजय जाधव
पैठण : पक्ष्यांच्या दृष्टीने वातावरणात झालेला सकारात्मक बदल, जायकवाडीच्या जलाशयातील कमी झालेल्या जलसाठ्यामुळे वाढलेले दलदलीचे क्षेत्र व थंडीचा लांबलेला कालावधी, यामुळे जायकवाडी जलाशयावरील विदेशी पक्ष्यांनी आपला मुक्काम यंदा लांबवला आहे. पक्षीप्रेमींच्या दृष्टीने ही आनंदाची बाब असून पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पक्षीप्रेमींच्या संख्येतही यंदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
जायकवाडीचा जलसाठा झपाट्याने कमी झाल्याने नाथसागराच्या बॅकवॉटर परिसरात मोठ्या प्रमाणावर दलदलीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर खाद्य उपलब्ध झाले आहे. त्यातच थंडीचा कालावधी लांबल्याने स्थलांतरित पक्ष्यांनी जायकवाडीवरील आपला मुक्काम वाढविला असल्याचे दिसून आले आहे. साधारणपणे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विदेशी पक्षी जायकवाडीचा निरोप घेण्यास प्रारंभ करतात; परंतु यंदा फेब्रुवारी महिना अर्धा होत आला असतानाही जायकवाडीच्या जलाशयावर विदेशी पक्षी प्रसन्न मनाने मुक्तपणे वावरताना दिसत आहेत.
यंदा पक्ष्यांची संख्या दुपटीने वाढली
जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयात सध्या पक्ष्यांचे अधिवेशन भरले असून यंदा या जलाशयावर गतवर्षीपेक्षा जास्त संख्येने विविध देशी -विदेशी पक्ष्यांनी हजेरी लावली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांनी सांगितले. यावर्षी पक्षी जगताचे आकर्षण ठरलेल्या फ्लेमिंगोचेही जलाशयावर मोठ्या संख्येने आगमन झाल्याने नाथसागरात बहार आली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट संख्येने पक्षी जलाशयावर आले आहेत. निसर्गाचा अविष्कार व पक्ष्यांची दुनिया जवळून अनुभवयाची असल्यास नाथसागर, जायकवाडी पक्षी अभयारण्य हेच डोळ्यासमोर येते. हजारो देशी- विदेशी पक्ष्यांच्या सहवासात राहताना एका वेगळ्या विश्वातील अनुभव पक्षिमित्रांना या ठिकाणी प्राप्त होतो. गेल्या ४० वर्षात येथे समृद्ध असे पक्षी जगताचे अस्तित्व निर्माण झाले असून आॅक्टोबर ते मार्चअखेरपर्यंत पक्षीमित्रांची पावले नाथसागराकडे वळतात.
नाथसागराच्या जलाशयावर व परिसरात आज हजारो पक्षांचे आगमन झाले असून त्यांच्या हालचाली व सुरेल आवाजाच्या प्रभावाने परिसरातील प्रसन्नता वाढली आहे. नाथसागराचा विस्तीर्ण पानपसारा व उथळ खोलीमुळे १९७८ पासून विदेशी स्थलांतरीत पक्षी येथे हजेरी लावत आले आहेत. भरपूर दलदल, बेट, वालुकामय भाग, आजूबाजूला असलेला दाट झाडोरा, स्थलांतरित पक्षांना लागणारे खेकडे, मासे व जलवनस्पती येथे मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने मध्य युरोप, लडाख, तिबेट, सैबेरिया, कच्छ, दक्षिण रशिया या विदेशातील पक्ष्यांचा नाथसागरावर आॅक्टोबर ते मार्च असा मुक्काम असतो. साधारणपणे हे पक्षी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून येण्यास सुरुवात होते. यंदा नेहमीप्रमाणे सँडपायपर व स्टिल्ट या पक्षांचे आगमन सर्वप्रथम झाले, त्यानंतर टफ्टेड पोचार्ड, कॉमन टिल्स, ग्रीन शॉक, सीगल, प्लव्हर, डनलिन, प्रँटीन किल, फ्लेमिंगो यांचे आगमन झाले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात डेमायझल क्रेन्स नाथसागरावर दाखल झाले आहेत. यासह टफ्टेड पोचार्ड, कूट पक्ष्यांची संख्या हजारोत असल्याने नाथसागरावर पक्षांच्या वसाहती अंतरा अंतराने जिकडे तिकडे दिसून येत आहेत. जायकवाडी परिसरात नागरिक, शेतकºयांना पक्ष्यांच्या सहवासाची सवय झाल्याने या पक्षाची स्थानिक नागरिक नेहमी काळजी घेताना दिसून आले आहेत. पक्षी व मानवातील संबंधाची विण जायकवाडी पक्षी अभयारण्यात घट्ट झाली असल्याचे
पक्षीमित्र दिलीप भगत यांनी सांगितले
जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसरात ज्ञानेश्वर उद्यानाच्या झाडाझुडपातील पक्षी, नाथसागरावरील बदक प्रवर्गातील पक्षी व जलाशयाच्या परिघाभोवती असलेल्या रानावनातील पक्षी अशा तीन ठिकाणी वेगवेगळे पक्षी आढळून येतात.
भुरळ घालणारी पक्ष्यांची दुनिया
रोहित उर्फ फ्लेमिंगो
नाथसागरावरील सर्वात लोकप्रिय पक्षी म्हणजे रोहित पक्षी आहे. यास नाथसागराचा दागिना म्हणून गौरविण्यात आले आहे. पक्षीमित्र व छायाचित्रकार याला कॅमेºयात कैद करण्यासाठी तत्पर असतात. राजहंसासारखा रूबाबदार दिसणारा, साडेचार फूट उंची लाभलेला व ‘ड’ या शब्दाप्रमाणे मानेचा आकार असलेला, पांढºया शुभ्र फ्लेमिंगोच्या पंखाखाली असलेली गुलाबी पिसे त्याच्या सौंदर्यात भर घालतात. एखादे विमान उड्डाण करण्यासाठी धावपट्टीवर धावते व नंतर उड्डाण घेते, अगदी तसेच हे पक्षी पाण्यावर धावत धावत बरेच अंतर कापतात व नंतर उड्डाण करतात. हे चित्र बघताना एक अलौकिक समाधान प्राप्त होते.
भारद्वाज पक्षी, टेलरबर्ड, फुलटोच्या, वेडा राघू , कोतवाल, खाटिक पक्षी
सकाळची वेळ ज्याच्या आवाजाने प्रसन्न होते तो, ऋषिने सोवळे पांघरावे तसा दिसणारा भारद्वाज पक्षी याचे दर्शन शुभ मानले जाते. या शिवाय लहान आकाराचा रॉबीन, टेलर बर्ड (शिंपी) पक्षी आपले घरटे असे काही विनतो की ते एखाद्या शिंप्यानेच शिऊन दिले असावे, असे वाटते. म्हणून यास टेलर बर्ड या नावाने ओळखले जाते. फुलटोच्या उर्फ रानबर्ड फुलांचा मध वेचताना पाहणे, तर वेडाराघू उर्फ ग्रीन बी ईटर त्याच्यासाठी मधमाशाची शिकार करताना पाहणे मोठे रोमांचकारी ठरते. छोट्या आकाराचा कोतवाल पक्षी जेव्हा हद्दीत येणाºया मोठमोठ्या पक्ष्यांचा पाठलाग करून हुसकावून लावतो, तेव्हा त्याचा संघर्ष प्रेरणादायी वाटतो.
खाटकाप्रमाणे, शिकार केलेले टोळ, बेडूक, सरडे झाडाला उलटे टांगून नंतर चवीने ताव मारणारा पक्षी म्हणजे खाटिक पक्षी होय.
शेतकºयांचा मित्र व शुभ मानला जाणारा नीलकंठ पक्षी, पिकांवरील किडे याचे मुख्य खाद्य आहे. याशिवाय बुलबुल, मैना, पोपट, होल े(हुलगे) व हुप्पी हे पक्षी आढळून येतात. या पक्षाच्या दर्शनासाठी जायकवाडीचा विश्रामगृह परिसर, संत ज्ञानेश्वर उद्यान आदी भागात वेळ घालवावा लागतो.
नाथसागराच्या जलाशयावर फ्लेमिंगो, टफ्टेड पोचार्ड, गडवाल, पीनटेल, वीजन, कूट, चक्रवाक, जलाशयाच्या काठाकाठाने करकोचे, ओपन बील स्टॉर्क, व्हाईट आयबीस, ब्लॅक आयबीस, रेड रॉन्क, ग्रिन रॉन्क, गॉडविट, शॉवलेर बदक, शेकटा, वँकटेल, सिगल्स, नदी सुरय आदी पक्षी हजारोच्या संख्येने जलक्रिडा करताना येथे दिसतात.

Web Title:  Nityaagara visitors' birds stay afloat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.