छत्रपती संभाजीनगर: देशाचे प्रधानमंत्री मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास ते संविधान बदलतील,असा अपप्रचार गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. मात्र जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही, अशी ग्वाही मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज गुरूवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. रॅलीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी जालना रोडवरील हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, आज येथे विविध धर्मगुरू येऊन भेटले. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात साधू,संतांची हत्या झाली. आपले सरकार आल्यावर सर्वप्रथम हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सन २०१९ पूर्वी मोदींची स्तुती करणाऱ्या ठाकरे यांच्या अनेक ऑडिओ क्लीप आहेत. अगोदर स्तुती करणे आणि नंतर टीका करता. सरडे असतात तसे ते रंग बदलात, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. आता संविधान बदलले जाणार असा अपप्रचार विरोधक करीत आहेत, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत कुणीही संविधान बदलणार नाही, कुणी यांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अवकाळी मुळे नुकसानग्रस्तांना मदतीचे निर्देशअवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेली जिवित आणि वित्तीयहानीची तातडीने दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना पंचनामे करण्याचे आणि जेथे नुकसान झाले आहेत तेथे तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना नमूद केले. तसेच जेथे पाणी टंचाई आहे,तेथे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येई, असे मुख्यमंत्री म्हणाले.