गंगापूर : कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी वर्षभरात दुसऱ्यांदा निविदा मागविल्या आहेत. मात्र निविदेत लागू करण्यात आलेल्या अटी व शर्तींपैकी काही अटींची पूर्तता करणे इच्छुकांना शक्य होणार नसल्याने सदरील अटी रद्द कराव्यात, अशी मागणी कारखान्याचे माजी अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे केली आहे. कारखान्याच्या निविदेत अट क्रमांक २६ अ, इ आणि ए मध्ये असे नमूद केले आहे की, करारापूर्वीची देणी निविदाधारकास देणे बंधनकारक राहील. तसेच कारखाना किमान पंधरा वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचे कबूल केले असताना अट क्रमांक १४ मध्ये बँक कारखान्याची कधीही विक्री करू शकते, असेही नमूद केले आहे. परिणामी अट क्रमांक ३ व अट क्रमांक १४ या परस्परविरोधी ठरतात. त्यामुळे त्या रद्द कराव्यात. याशिवाय अट क्रमांक २ मध्ये नमूद सुरक्षा ठेवीची रक्कम जास्त असून तीदेखील कमी करावी. शिवाय कराराचा कालावधी हंगाम २०२१-२२ पासून सुरू होणार असल्याचे नमूद आहे, परंतु हा हंगाम घेणे शक्य होणार नसल्यामुळे २०२२-२३ पासून हंगाम सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अटी व शर्तीचा फेरविचार न झाल्यास निविदा प्रक्रियेत कोणीही भाग घेणार नाही व कारखाना चालू होऊ शकणार नाही, परिणामी बँकेचीही वसुली होऊ शकणार नाही. त्यामुळे निविदेतील अटी-शर्तींत दुरुस्ती करावी, अशी विनंती डोणगावकर यांनी केली आहे.
किचकट अटी-शर्ती टाकल्याने कारखाना कोणी भाड्याने घेईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:02 AM