'आमच्या आंदोलनासाठी कोणीही एक रुपयाही देऊ नये, याआधी कुणी दिले असेल तर नाव सांगावे'; मनोज जरांगे यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:11 PM2023-11-10T12:11:41+5:302023-11-10T12:14:27+5:30
दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाचे राज्यात सुरू असलेले आंदोलन हे सर्वसामान्य मराठ्यांनी एकत्र येऊन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी कोणाकडूनही एक रुपयाही घेतला जात नाही. यामुळे राज्यातील अधिकारी, राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांनी आमच्या आंदोलनासाठी कोणीही एक रुपयाही देऊ नये, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. एवढेच नव्हे तर याआधी कुणी दिले असेल तर त्याचे नाव आम्हाला सांगावे, असेही जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती आता ठणठणीत होत आहे. दिवाळीनंतर जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. राज्यभरातून त्यांना सभा घेण्यासाठी आमंत्रित केले जात असल्याने जरांगे-पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा करण्याची घोषणा केली.
गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्यसरकारने घ्यावा, यासाठी राज्यातील सर्व मराठा समाजाने प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करायचे आहे. या आंदोलनाची तयारी सुरू करावी. आपल्या दौऱ्यात शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून सुरुवात करणार आहोत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे.
मात्र, मुख्यमंत्री याविषयी वेगळे बोलले असल्याच्या बाबीकडे जरांगे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री जे बोलले त्याविषयी २४ डिसेंबरला बोलू. आता मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावे मिळत आहेत. यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. हे आता भुजबळ यांना सहन होत नसल्याचे जरांगे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी ते काहीतरी करत राहणारच आहेत. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याची स्पीड वाढवावी, अशी आमची सरकारला विनंती असल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये, असे आपण मराठा भावांना आवाहन करीत असल्याचे जरांगे म्हणाले.