औरंगाबाद : जिल्ह्यात नववी ते बारावीचे ९.१२ लाख विद्यार्थी आहेत. त्यापैकी जेमतेम २० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचत आहे. तर ऑनलाईन अभ्यास, स्वाध्याय, रीड टू मीसारख्या उपक्रमांना नगण्य प्रतिसाद नोंदवला जात आहे. ८० टक्के विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ३३ हजार ७७५ पालकांचे मोबाईल ‘रीड टू मी’ ॲप डाऊनलोड करून स्वयंअध्ययनासाठी उपलब्ध झाले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) स्टुडंट व्हाॅटस् ॲप बेस्ड् डिजिटल होम असेसमेंट (स्वाध्याय) उपक्रमात सुरुवातीला १ लाख ९७ हजार विद्यार्थी स्वाध्याय सोडवत होते. मात्र याकडे शाळांकडून दुर्लक्ष झाल्याने २६ व्या आठवड्यात केवळ १७८७ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय डाऊनलोड केला. कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणात ९.१२ लाखांपैकी सरासरी २० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सातत्याने सहभाग नाही. असे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उर्वरित ८० टक्के म्हणजेच ७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल शिक्षक संघटना, शिक्षणतज्ज्ञ उपस्थित करत आहेत.
अध्ययनस्तर घरसला...जिल्ह्यातील ऑनलाईन शिक्षणाच्या दीड वर्षाच्या काळात विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर ६९ टक्क्यांहून घसरून ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला. विद्यार्थी भाषेसह गणितात कच्चे राहिल्याचे नुकतेच अध्ययनस्तर निश्चितीतून समोर आले. या परिस्थितीसह ऑनलाईन शिक्षणाच्या अडचणी सीईओ नीलेश गटणे, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांशी चर्चा करून शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीतही मांडल्याचे शिक्षणाधिकारी देशमुख म्हणाले.
साधनांच्या उपलब्धतेचा अभावविद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी शिक्षण विभागासह डाएट, समग्र शिक्षा आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्रयत्न करत आहेत. मात्र अल्पावधीत शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणाची परिस्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. नेटवर्कची समस्या, इंटरनेट, मोबाईल, साधनांच्या उपलब्धतेचा अभाव आहे. शिक्षण विभागाकडून विद्यार्थी उपस्थितीबद्दल शाळांकडे अद्यापही ऑनलाईन शिक्षणाच्या प्रतिसादाबद्दल विचारणा केली नसल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाले. त्यामुळे काही उपक्रमशील शिक्षकांचे वर्ग, शाळा वगळता सध्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे.
तालुका - रीड टू मी ॲप इन्स्टॉलऔरंगाबाद शहर १ - ६,४७५औरंगाबाद शहर २ - ९९८पैठण -५,८००खुलताबाद -५,२३५कन्नड -४,४८४गंगापूर -१,०७४सोयगाव -१,००७फुलंब्री -५१५औरंगाबाद -२४२