कन्नड - देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली मात्र आजही गावात जाण्यासाठी धड रस्ते नाहीत. वारंवार आंदोलन करुनही उपयोग न झाल्याने निपाणी येथील ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत राष्ट्रपतींना इच्छा मरणाची परवानगी मागीतली आहे.
निपाणी हे साधारण दोन हजार लोकवस्तीचं गाव. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पाचवीपर्यंत शाळा. तर गावापासुन दीड कि मी. अंतरावर खाजगी संस्थेची इयत्ता बारावीपर्यंत शाळा. गावाला तीन बाजूंनी जोडणारे रस्ते आहेत. त्यापैकी औराळा ते निपाणी हे ५ किमी., निपाणी ते जेहूर ३ किमी. व निपाणी ते बोलठाण फाटा दिड किमी. अशा अंतराचे रस्ते आहेत. मात्र या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे.
पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखलच असतो. एखादा व्यक्ती आजारी पडल्यास अथवा बाळंतपणासाठी स्त्रीला दवाखान्यात नेणे म्हणजे एक दिव्यच आहे. रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी वारंवार आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला मात्र प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनी आश्वासने देवून वेळ मारून नेली आणि ग्रामस्थांची फसवणुक केली असा आरोप सिंधुबाई सुर्यवंशी यांनी केला. या रस्त्यावरुन रुग्णांना दवाखान्यात नेतांना होणाऱ्या मरणयातनांपेक्षा ग्रामस्थांना इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.