औरंगाबाद : कोरोनामुळे रखडलेल्या परीक्षांची तयारी सुरू असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करणे, कालबाह्य पदोन्नती यासह विविध मागण्यांसाठी गुरूवार दि. २४ पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या देत कामावर बहिष्कार टाकला. या आंदोलनामुळे परीक्षेच्या कामावर मोठाच परिणाम होणार आहे.
केंद्र व राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करून दोन वर्षांचा कालावधी उलटला. उच्च व तंत्रशिक्षण विभागातील प्राध्यापक प्रवर्गाला सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. मात्र राज्यातील १४ विद्यापीठांचे कर्मचारी, अधिकारी अजूनही या आयोगाच्या लाभापासून वंचित आहेत. यासोबतच कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती व अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालये कर्मचारी संयुक्त कृती समिती स्थापना केली आहे.
कामबंद आंदोलनात ४५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ. कैलाश पाथ्रीकर यांनी दिली. देवगिरी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालयातील कर्मचारीही यात सहभागी झाले होते. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेतली जाणार नसल्याचेही यावेळी संघटनेने सांगितले. कर्मचाऱ्यांचे आंदोलन ३० सप्टेंबरपर्यंत लांबल्यास दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा कशा घेणार याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.