श्वान पथकाची उल्लेखनीय कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:02 AM2017-12-17T01:02:06+5:302017-12-17T01:02:15+5:30
खून, दरोडा, घरफोडीसारख्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खून, दरोडा, घरफोडीसारख्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे समोर आले आहे. या श्वान पथकाला जानेवारीपासून कालपर्यंत तब्बल १०५ कॉल्स प्राप्त झाले आणि प्रत्येक कॉल्सला श्वानांनी तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद देऊन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मदत केली.
खून असो अथवा दरोड्यासारखा गंभीर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी धाव घेतात आणि आरोपीचा माग काढण्यासाठी सर्वप्रथम श्वान पथकाला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतात. ग्रामीण भागात शेतवस्ती, वाडी अथवा तांड्यावर दरोडे पडतात. ज्या ठिकाणी वाहने जाऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी पायी जाऊन दरोडे टाकण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. दरोडेखोर अज्ञात असतात. त्यांना कोणीही पाहिलेले नसते. अशावेळी ते कोठून आले अथवा कोणत्या दिशेने पळाले, याबाबतचा अचूक माग काढून पोलिसांच्या तपासाला दिशा देण्याचे काम पोलिसांच्या श्वान पथकातील गुन्हे शोध श्वान करीत असते. ग्रामीण पोलीस दलात स्वीटी आणि खुशी हे गुन्हे शोध श्वान आहेत. ग्रामीण भागात जानेवारीपासून कालपर्यंत तब्बल १०३ गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी दोन्ही श्वानांना बोलावण्यात आले होते. यासाठी श्वान पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक एम.बी. घुगे, सहायक उपनिरीक्षक नासेर पठाण, जमादार गणेश व्यवहारे , प्रकाश मिसाळ, एस.व्ही.तळेकर हे श्वान हॅण्डलर आहेत.
मारेकºयाच्या दारात गेले श्वान
उपनिरीक्षक घुगे म्हणाले की, सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे ११ डिसेंबर रोजी एका महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर प्रेत एका शेतातील विहिरीजवळ नेऊन टाकून आरोपी पसार झाले होते. दुसºया दिवशी श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळी आरोपीची सापडलेली चप्पल हुंगल्यानंतर श्वान थेट आरोपीच्या घरापर्यंत गेले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य आरोपींची नावे आणि खुनाचे कारणही सांगितले.
व्हीआयपी बंदोबस्तप्रसंगी श्वानाची मदत
जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेटी देण्यासाठी देश-विदेशातील व्हीव्हीआयपी लोक औरंगाबादेत येतात. राजकीय नेत्यांचे दौरेही होतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्बशोधक श्वान पथकाकडून त्यांच्या दौºयापूर्वी तपासणी केली जाते. ग्रामीण पोलीस दलात रेनो आणि गुरुनो ही दोन श्वान बॉॅम्बशोधक आहेत. त्यांचीही उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे. देशपातळीवरील पोलीस श्वान मेळाव्यात या श्वानांनी पारितोषिके प्राप्त केली आहेत.