छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही प्रचंड आदर करतो. औरंगाबाद शहराशी त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांचे नाव शहराला देण्यात आले. आता याच धर्तीवर राज्य आणि केंद्र शासनाने मुंबईचे छत्रपती शिवाजी राजे महानगर, पुण्याचे फुलेनगर, कोल्हापूरचे छत्रपती शाहूनगर, नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरी, मालेगावचे माैलाना आझाद असे नामकरण करावे, अशी मागणी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी केली.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. या मुद्द्यावर काही मंडळी हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये माध्यमेही आघाडीवर असल्याचा आरोप त्यांनी केला. मुळात चारशे वर्षांपूर्वी शहराचे नाव खडकी होते. त्यानंतर मलिक अंबरने नवे शहर वसविले. अंबराबाद, खडकी या नावांचा विचार का झाला नाही? ३४ वर्षे नामांतराच्या मुद्द्यावर घाणेरडे राजकारण करण्यात आले. भाजपला महाराष्ट्रात औरंगाबाद नाव चालत नाही. बिहारमध्येही एक औरंगाबाद आहे. तेथील खासदार तर भाजपचा आहे. बिहारचे औरंगाबाद तुम्हाला चालते मग महाराष्ट्रातील औरंगाबाद का नाही? सर्वोच्च न्यायालयाने शहराची नावे बदलण्याच्या मुद्द्यावर चांगली टिप्पणी केल्याचे इम्तियाज यांनी नमूद केले.