आता वाहतूक नियम तोडणाऱ्यांना देणार ई-चालान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 03:43 PM2019-03-31T15:43:42+5:302019-03-31T15:44:47+5:30
दंडाची रक्कम जागेवरच वसूल केली जाणार आहे.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना एप्रिलपासून थेट ई-चालान मिळणार आहे. एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड स्वॅप करून वाहनचालकांकडून ई-चालानच्या माध्यमातून दंडाची रक्कम जागेवरच वसूल केली जाणार आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या चालकांवर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. वाहनचालकांना कागदी चालान देऊन वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाठवून तेथे दंड भरून घेतला जाते. दंड भरल्याची पावती पोलिसांकडून वाहनचालकाला मिळते. ही पावती दाखविल्यानंतर कारवाई करणारे पोलीस जप्त लायसन्स परत करतात. यासोबतच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे आणि मोबाईलवर छायाचित्र काढून घरपोच दंडाची पावती पाठविण्याचे कामही सेफ सिटी विभागाकडून सुरू आहे.
घरपोच पावती प्राप्त झाल्यानंतर बँकेत अथवा पोस्ट कार्यालयात दंड भरण्याची व्यवस्था करण्यात आली. असे असले तरी शासनाने मात्र आता कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य दिले आहे. वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कमही आता ई- चालान पद्धतीने भरून घ्यावी, असा आदेश पोलीस महासंचालकांनी दिला. त्यानुसार सोमवारपासून शहर वाहतूक विभागातील सहायक पोलीस आयुक्त ते पोलीस शिपाई यांना ई-चालानचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून दंडाची रक्कम ई-चालान पद्धतीने वसूल केली जाणार आहे. वाहनचालकांकडून एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड स्वॅप करून दंड भरून घेतला जाणार आहे.
काय असेल ई-चालानमध्ये
वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर ई-चालान यंत्रात वाहनाचा क्रमांक, वाहनचालकाचा लायसन्स क्रमांक, संपूर्ण नाव, पत्ता, वाहतूक नियम मोडल्याचे ठिकाण, तारीख आणि ठिकाण याबाबतची माहिती वाहतूक पोलीस टाकतील. ही माहिती ई-चालान सॉफ्टवेअरमध्ये कायमस्वरूपी साठवून ठेवली जाईल. यामुळे वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा वाहतूक नियम मोडले हे एका क्लिकवर समजणार आहे.
उद्यापासून होणार अंमलबजावणी
पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, १ एप्रिलपासून ई-चालानची अंमलबजावणी होणार आहे. याकरिता सहायक पोलीस आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक, ११ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३२० वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना ई-चालानचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण दोन दिवसांत पूर्ण होईल.