- बापू सोळुंके
औरंगाबाद : लवकरच राज्य विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, तसेच रस्त्यावरील मंगळसूत्र चोरी, लुटमारीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण यावे, यासाठी पोलिसांची गस्त अधिक प्रभावी करण्यावर पोलीस आयुक्तांनी भर दिला आहे. गस्त घालणाऱ्या ११० वाहनांना जीपीएस (ग्लोबल पोजिसिंग सिस्टीम) यंत्रणा बसविण्यात आली. एवढेच नव्हे तर पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि संवेदनशील पोलीस ठाणेदारांच्या वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.
वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरातील गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. ४ दिवसांमध्ये शहरातून ८ महिलांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. चोरटे दिवसाढवळ्या महिलांच्या सौभाग्याच्या लेण्यांवर डल्ला मारत असल्याने महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रस्त्यावर पोलीस दिसत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होते. मंगळसूत्र हिसकावण्यासह रस्त्यावर होणारी लुटमार, वाहनचोरीस आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गस्त अधिक प्रभावी करण्याचे आदेश दिले. पीटर मोबाईल, पोलीस ठाण्याच्या टू मोबाईल, थ्री मोबाईल व्हॅन, पीसीआर कार, बीट मार्शल कर्मचारी आणि टीएफसी मोबाईल व्हॅनमार्फत गस्त करण्यात येते.
एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अवघ्या आठ ते दहा मिनिटांत गस्तीवरील पोलीस तेथे पोहोचले पाहिजेत, अशी अपेक्षा असते. मात्र, बऱ्याचदा गस्तीवरील पोलीस त्यांचे वाहन एका ठिकाणी असते आणि पोलीस नियंत्रण कक्षाला त्यांचे वेगळेच लोकेशन कळवितात. असे प्रकार यापुढे होऊ नये, गस्तीवरील पोलीस व्हॅन क ोठे आहे, याबाबतची अचूक माहिती पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना त्यांच्या संगणकावर दिसावी, याकरिता सर्व वाहने आता जीपीएसच्या कक्षेत आणण्यात आली आहेत. ठाणेदाराच्या कार, जीपपासून ते बीट मार्शल पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकींना आता जीपीएस बसविण्यात आले आहे. यामुळे कोणते वाहन कोठे आहे, याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना लगेच कळते.
या वाहनांना बसविले जीपीएसपीटर मोबाईल १७, पोलीस ठाण्याच्या टू मोबाईल १७, थ्री मोबाईल व्हॅन ३, पीसीआर कार १२, बीट मार्शल कर्मचारी २८ आणि टीएफसी बीट मार्शल १३, टीएफसी मोबाईल व्हॅन ५, तसेच जुन्या टीएफसी बीट मार्शल १३ मोबाईल हॅण्डसेटचे रूपांतरही जीपीएसमध्ये करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांना सीसीटीव्ही पोलीस आयुक्त, ३ उपायुक्त, सिटीचौक, क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या प्रमुखांच्या वाहनांना फिरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.