आता जनता भाजपाला करणार बाय-बाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:40 AM2017-10-04T00:40:39+5:302017-10-04T00:40:39+5:30
विकासाच्या नावाने राज्य आणि केंद्रात बोंबाबोंब चालू आहे. लोकांना या सरकारने वाºयावर सोडले आहे. मूळ प्रश्नांना बगल देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चायवर बोलतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी गायीवर बोलतात; पण जनता यांना कंटाळली असल्यामुळे भाजपाला बाय- बाय करीत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विकासाच्या नावाने राज्य आणि केंद्रात बोंबाबोंब चालू आहे. लोकांना या सरकारने वाºयावर सोडले आहे. मूळ प्रश्नांना बगल देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चायवर बोलतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी गायीवर बोलतात; पण जनता यांना कंटाळली असल्यामुळे भाजपाला बाय- बाय करीत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले़
प्रभाग ५ व १९ मधील काँगे्रस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर आ.डी.पी.सावंत, प्रवक्ते अतुल लोंढे, नरेंद्र चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, प्रभारी डॉ. श्याम पाटील तेलंग, सभापती माधवराव मिसाळे, सुखदेव जाधव, अॅड.निलेश पावडे, जयश्री पावडे, महेंद्र पिंपळे, अपर्णा नेरलकर, फारूक अली खान, राजू काळे, चित्रा गायकवाड, दीपाली मोरे, अंबिका काकडे यांची उपस्थिती होती.
खा.चव्हाण म्हणाले, देशातून भाजपाला हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. आधी मनपावर व त्यानंतर देश आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणार आहे. या सरकारने महागाई वाढविली. सामान्यांचे जगणे अवघड केले.
पेट्रोलचे भाव वाढविले, रेशन दुकानावरील साखर बंद केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना बदलण्याचे काम हे सरकार करीत आहेत. मागासवर्गीयांचे आरक्षण काढण्याचे पातक मोदी व फडणवीस करीत आहेत.
देशामध्ये मनूवाद आणण्याचा आरएसएसने कट रचला आहे. दलित वस्ती विकासासाठी आलेला ३० कोटी रुपयांचा निधी या शासनाने महापालिकेला दिला नाही. मागील तीन वर्षांपासून महापालिकेला दोन्ही शासनाकडून एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मत मागण्याचा भाजपाला अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी आ. डी. पी. सावंत म्हणाले, जेएनएनयुआरएम व गुरु - त्ता- गद्दीच्या माध्यमातून शहराचा मोठा विकास झाला. नांदेडकरांसाठी विकास लांब नाही. कारण त्यांच्या जवळ खा. अशोकराव चव्हाण यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व आहे.
काँग्रेस पक्ष सामाजिक सलोखा राखण्यामध्ये पुढाकार घेतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारसरणीला मानणारा हा पक्ष आहे. खा.अशोकराव चव्हाण हे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. अशोकरावांनी बावरीनगरचा विकास करण्यासाठी मोठा निधी दिला. या भागाचा संपूर्ण विकास होण्यासाठी पुन्हा एकदा खा.अशोकराव चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.