आता शिक्षकांना मिळणार २२ लाखांपर्यंत कर्ज; शिक्षक पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय
By विजय सरवदे | Published: August 30, 2022 06:44 PM2022-08-30T18:44:01+5:302022-08-30T18:44:47+5:30
हडको येथील साखरे मंगल कार्यालयात झालेल्या या सभेच्या पहिल्या सत्रात गुणवंत शिक्षकाचे पाल्य, तालुक्यातील काही आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद : शिक्षक पतसंस्थेने सभासदांना २२ लाखांपर्यंत कर्ज वाटप करणे, तसेच संस्थेला झालेला १ कोटी ३१ लाख ९७ हजार ९०८ रुपयांचा नफा सभासदांना लाभांश स्वरुपात (डिव्हिडंट) वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला. तथापि, दरवर्षीप्रमाणे यंदाही या सभेला गोंधळाचे गालबोट लागलेच. विरोधकांनी सचिव व अध्यक्षांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सभात्याग केल्यानंतरही ही सभा सायंकाळपर्यंत चालली.
तालुका जि.प. शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी चेअरमन महेंद्र बारवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शिक्षक सभासदांनी अध्यक्ष तसेच सचिव अनिल निलंगे, त्रिशला लोहाडे, प्रकाश दाणे, राजेश भुसारी, संतोष ताठे, रमेश जाधव, श्रीराम काथार, रशीद बेग, प्रवीण संसारे, लता पठाडे यांना पतसंस्थेच्या उपविधी दुरुस्तीबाबत प्रश्न विचारून कर्ज मर्यादा वाढविणे, संचालक संख्या १३ वरून १७ करणे, कल्याण निधीतून मयत शिक्षकांच्या कुटुंबीयांना भरघोस मदत करणे, दिव्यांग शिक्षकांसाठी पतसंस्थेत लिफ्ट बसविणे आदी मागण्या केल्या.
हडको येथील साखरे मंगल कार्यालयात झालेल्या या सभेच्या पहिल्या सत्रात गुणवंत शिक्षकाचे पाल्य, तालुक्यातील काही आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मागील ऑनलाईन झालेल्या दोन वार्षिक सभांच्या ताळेबंद पत्रकाचे वाचन संस्थेचे विद्यमान सचिव अनिल निलंगे यांनी सुरू केले. तेव्हा संस्थेचे सभासद तथा माजी चेअरमन दिलीप ढाकणे, श्रीराम बोचरे, राजेंद्र मुळे, विजय साळकर, डॉ. हरिश्चंद्र रामटेके, दिलीप गोरे, प्रदीप मोरे, प्रकाश साळवे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्यामुळे उपस्थित काही सभासदांनी घोषणा देत सभात्याग केला.
सभागृहाबाहेर घोषणाबाजी
दिलीप ढाकणे, विजय साळकर, हरिश्चंद्र रामटेके व अन्य सभासद शिक्षकांनी सभागृहाबाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. संचालक मंडळाचा निषेध व्यक्त केला. यावेळी श्रीराम बोचरे यांनी आरोप केले की, संचालक मंडळाने बांधकाम संबंधी उडवाउडवीची उत्तरे दिली, ४ कोटी ५५ लाखांपर्यंत व्याज प्राप्त झाले आहे. असे असताना सभासदांच्या माथी १ कोटी ६ लाखापर्यंत लाभांश वाटप हे संचालक मंडळ करणार आहे.