आता भाज्यांनीही गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 02:13 PM2020-10-07T14:13:33+5:302020-10-07T14:14:45+5:30
महागाईचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत असून डाळीनंतर आता दोडके, फुलकोबी, गवार या फळभाज्यांचे दर १०० रूपयांच्याही पुढे गेले आहेत.
औरंगाबाद : महागाईचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत असून डाळीनंतर आता दोडके, फुलकोबी, गवार या फळभाज्यांचे दर १०० रूपयांच्याही पुढे गेले आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतातच भाज्या खराब होत असून आवक कमी झाली आहे. जाधव वाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात निम्म्याने भाज्यांची आवक घटली आहे. औरंगपुरा भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांकडील भाज्यांच्या टोपल्या रिकाम्या दिसत आहेत.
आवक घटल्याने भाज्यांचे भाव मागील १० दिवसांत किलोमागे २० ते ३० रूपयांनी वाढले आहेत. गेल्या महिन्यात ६० ते ८० रूपये किलोने विक्री होणारे दोडके, फुलकोबी, गवार शेंगा, चवळी आता ८० ते १०० रूपयांना मिळत आहे. २० ते ३० रूपयांना मिळणारी पत्ताकोबी ५० ते ६० रूपयांना विकली जात आहे. भेंडी व गाजराचे भाव ८० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. लवंगी मिरची ६० ते ८० रूपये, काकडा मिरची १०० ते १२० रूपचे किलो झाली आहे. फक्त टोमेटोची आवक वाढल्याने ते २० ते ३० रूपयांनी कमी होऊन ४० ते ५० रूपये किलो या दराने मिळत आहेत.