औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील सव्वा कोटीच्या दुष्काळ अनुदान वाटप घोटाळ्यातील सुरस कथा आता बाहेर येत आहेत. हर्सूल कारागृहात असलेल्या आरोपीला दुष्काळ अनुदानाची खिरापत देण्यात आली. विशेष म्हणजे आरोपी कारागृहात असताना या रकमेची उचलही करण्यात आली आहे. वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या परिचारिकेस जिल्हा बँकेच्या गाजगाव आणि वेरूळ येथील शाखेतून दुष्काळ अनुदानापोटी १ लाख ३७ हजारांची ‘गिफ्ट’ मिळाली आहे.दुष्काळी अनुदानापासून गरजू आणि खरे शेतकरी अद्याप वंचित असताना गंगापूर तालुक्यात बनावट शेतकऱ्यांच्या नावाचा लाभार्थींच्या यादीत समावेश करून सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. ‘लोकमत’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर खळबळ उडाली. गंगापूर तालुकाच नव्हे, तर जिल्हाभरात हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे. जिल्हा बँक आणि महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने झालेल्या या घोटाळ्यात आतापर्यंत नऊ जणांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा बँकेचे सहा अधिकारी - कर्मचारी आणि तीन तलाठ्यांचा यात समावेश आहे. मीनल कोंबळे या जि.प.च्या वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. कोंबळे यांचे जिल्हा बँकेच्या गाजगाव आणि वेरूळ येथील शाखेत खाते आहे. गाजगाव येथील त्यांच्या खात्यावर ५ आणि ६ एप्रिल २०१६ रोजी चार वेळा ३८,९१० रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले. त्यानंतर वेरूळ येथील शाखेत ३० जानेवारी ते ६ एप्रिल २०१६ या कालावधीत नऊ वेळा तब्बल ९८,१०० रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले. कोंबळे यांच्या नावावर शेती नसतानाही एकूण १३ वेळा त्यांना १ लाख ३७ हजार रुपयांच्या अनुदानाचे ‘गिफ्ट’ देण्यात आले, हे विशेष.
नर्सला दीड लाखाचे ‘गिफ्ट’
By admin | Published: July 16, 2016 1:05 AM