लठ्ठ बालकांना मधुमेहाचा असतो अधिक धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 05:41 PM2019-11-14T17:41:50+5:302019-11-14T17:45:09+5:30
बाल दिन व मधुमेह दिन विशेष : तज्ज्ञ सांगतात जंकफूड टाळा
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : मधुमेह, रक्तदाब हे श्रीमंतांचे आजार म्हणून ओळखले जायचे; पण आता बदललेल्या जीवनशैलीमुळे जीवनातील सुसह्यता श्रीमंतांप्रमाणेच मध्यम स्तरावरच्या कुटुंबातही दिसते. त्यामुळे मधुमेहासारख्या आजाराने सगळीकडेच आपले जाळे पसरले असून, आता त्याच्या विळख्यात लहान बालकेही आली आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.
१४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन आणि बाल दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्त तज्ज्ञांशी संपर्क साधला असता आता १० वर्षांपुढील बालकांमध्येही टाईप २ प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याविषयी सांगताना डॉक्टर म्हणाले की, टाईप १ आणि टाईप २ हे मधुमेहाचे दोन प्रकार आहेत.
यापैकी टाईप १ प्रकारचा मधुमेह हा नेमका कशामुळे होतो, हे अजूनही ठामपणे सिद्ध झालेले नाही. यामध्ये स्वादुपिंडामधील बीटा पेशी नष्ट होत जातात आणि त्यामुळे इन्सुलिन निर्मितीची प्रक्रिया थांबते. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याशिवाय पर्याय नसतो. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही टाईप १ मधुमेह होऊ शकतो. लघवीला जास्त वेळेस जावे लागणे, जास्त भूक व तहान लागणे, थक वा येणे, चक्कर येणे, पाय दुखणे, वारंवार वेगवेगळे जंतुसंसर्ग होणे ही लक्षणे यात दिसून येतात. या आजाराची बालके कमी उंचीची व कमी वजनाची असतात.
टाईप १ चे प्रमाण तुलनेने भारतात कमी आहे; पण त्यातही हा आजार लहान मुलांमध्ये अधिक आढळून येतो. टाईप २ प्रकारचा मधुमेह चाळिशीनंतर होतो; पण जीवनशैलीतील बदल हे याचे मुख्य कारण असल्यामुळे सध्या या प्रकारच्या मधुमेहींचे प्रमाण चिंताजनक प्रमाणात वाढते आहे.
मोठ्यांचा मधुमेह म्हणून ओळखला जाणारा टाईप २ आता शालेय विद्यार्थ्यांमध्येही दिसून येत आहे. जास्त वजन, जास्त चिंता, अवेळी झोप, जेवणाच्या अनियमित वेळा, मैदायुक्त पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव ही याची कारणे आहेत. पायी फिरणे, गोड पदार्थ बंद करणे, तेलकट- तुपकट पदार्थांचे कमी सेवन आणि नियमित गोळ्या- औषधींचे सेवन यामुळे टाईप २ नियंत्रणात राहू शकतो.
बालकांमध्ये दिसतेय प्री-डायबेटिक स्टेज
मैदायुक्त पदार्थांचे जास्त सेवन, वाढलेला ताणतणाव, मैदानी खेळ न खेळणे, अभ्यास किंवा मोबाईल, टीव्ही यामुळे एकाच जागी तासन्तास बसल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होणे, या सगळ्या कारणांमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे. लहान वयातील लठ्ठपणामुळे भविष्यात या मुलांना फारच कमी वयात मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मुलांमधील लठ्ठपणाला प्री-डायबेटिक स्टेज म्हणून ओळखले जाते. त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. मधुमेह असणाऱ्यांना हृदयविकार, किडनी खराब होणे, अंधत्व येण्याचे प्रमाण अधिक असतो. अपघातांव्यतिरिक्त पाय कापण्याचे दुसरे मोठे कारण मधुमेह हे आहे.
-डॉ. तुषार चुडीवाल
बाल मधुमेहींचे वाढते प्रमाण-
लठ्ठपणा, बदललेली जीवनशैली आणि आनुवंशिकता या तीन कारणांमुळे टाईप २ प्रकारचा मधुमेह होतो. सामान्यपणे हा आजार ४० च्यानंतर व्हायचा; परंतु जीवनशैलीतील बदलामुळे तरुणांमध्ये आणि आता तर अगदी १० वर्षांच्या पुढील शालेय विद्यार्थ्यांमध्येही हा आजार वाढतो आहे. मोठ्या शहरांमधील बालकांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. जास्त वाढलेला ‘स्क्रीन टाईम’, जंकफूड ही याची कारणे असून ‘सिटिंग डिसीज’ म्हणून या आजाराला ओळखले जाते.
-डॉ. अर्चना सारडा