शेतकऱ्याकडून ५ हजारांची लाच घेणारा दप्तर कारकून एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 01:12 PM2024-05-16T13:12:54+5:302024-05-16T13:14:35+5:30
पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पातील गाळ शेतात टाकून देण्यासाठी घेतली लाच
कन्नड : पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी वापरलेल्या जेसीबी व ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दप्तर कारकुनास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई १५ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नेवपूर येथे करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, तक्रारदार शेतकरी हे पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पातून जेसीबीने गाळ उपसून तो ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करून त्यांच्या शेतात टाकत होते. त्यांना हा गाळ शेतात टाकून देण्यासाठी आणि त्यांच्या जेसीबी व ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी चिंचोली लिंबाजी येथील पाटबंधारे विभागाचा दप्तर कारकून राहुल पांडुरंग सुरवसे (वय ४२) यांनी ५ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच देण्याचे ठरले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पडताळणी सापळा रचण्यात आला.
१५ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नेवपूर येथे तक्रारदराकडून दप्तर कारकून राहुल पांडुरंग सुरवसे याने पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर पथकाने झडप घालून सुरवसे यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई या विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक राजू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक केशव दिंडे, पोलिस निरीक्षक अमोल धस, पोहे अशोक नागरगोजे, पोलिस अंमलदार युवराज हिवाळे, चालक बागुल यांच्या पथकाने केली.