लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश घेणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच जुन्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मात्र असंतोष निर्माण होत आहे. जुन्यांना डावलले जात असल्याची भावना तीव्र झाल्याने शुक्रवारी या असंतोषाला एका बैठकीतून व्यक्त करण्यात आले.वर्षानुवर्षे काम करुन शहर व जिल्ह्यात पक्ष वाढवणाºया जुन्या कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ येताच मात्र पडद्याआड व्हावे लागत आहे. पडद्यावरुन जुने चेहरे बाजूला पडले असून नवे चेहरे पुढे आले आहेत. हीच बाब जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सातत्याने खटकत आहे. शुक्रवारी शहरात भाजपाचे माजी महानगराध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. धनाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते, नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश घेत आहेत.त्यांचे पक्षामध्ये स्वागतच असल्याचे सांगताना जुन्यांना मात्र डावलू नये, अशी भूमिकाही स्पष्टपणे बैठकीतून पुढे आली आहे. मागील काही दिवसांपासून बैठकामध्ये जुने पदाधिकारी मंचावरुन दूर झाले आहेत तर नव्यांची मात्र मोठी गर्दी झाली आहे. पक्षात प्रवेश देण्यासाठी एक पद्धती आहे. ती पद्धतीही आता जणू बंदच झाली आहे. पक्षात प्रवेश देताना सक्रिय सदस्य करुन घेणे आवश्यक आहे. मात्र असे न करता थेट प्रवेश दिला जात आहे. इतकेच नव्हे, तर मंचावरही स्थान दिले जात आहे.देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपाला चांगले यश मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत तिकीट देताना भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉ. धनाजीराव देशमुख यांनी निष्ठावंतांनाच तिकिटे दिली जातील, असे सांगितले. जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करु, असेही त्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीस नंदू कुलकर्णी, जीवन कुलकर्णी, जनार्दन ठाकूर, मोहनसिंह तौर, बागड्या यादव, मुरली गजभारे, गिरीश भंडारे, मरीबा कांबळे, भरत यादव, अनिलसिंह हजारी, व्यंकटेश साठे, प्रभू कपाटे, सिद्धार्थ धुतराज उपस्थित होते़ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जुने व नवे असा वाद दिवसेंदिवस तीव्रच होणार आहे. याचा फटका पक्षाला किती बसेल हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
भाजपात जुना-नवा वाद उफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:34 AM