गावाची एकी, प्रगती पाहून वृद्ध दाम्पत्य भारावले; भेटीनंतर शाळेला दिले १० संगणक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 07:39 PM2020-01-06T19:39:47+5:302020-01-06T19:44:22+5:30

औरंगाबाद येथील वृद्ध दाम्पत्याचा मोठेपणा

The old couple impressed by seeing the unity and progress of the village; 10 computer gifts to the school after the visit | गावाची एकी, प्रगती पाहून वृद्ध दाम्पत्य भारावले; भेटीनंतर शाळेला दिले १० संगणक भेट

गावाची एकी, प्रगती पाहून वृद्ध दाम्पत्य भारावले; भेटीनंतर शाळेला दिले १० संगणक भेट

googlenewsNext
ठळक मुद्देवाकी ग्रामस्थांशी साधला संवाद गावाची संस्कृती जाणून घेत असताना शाळेलाही मदत

चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील वाकी या निर्मल ग्रामाला पाहण्यासाठी व ग्रामीण भागातील संस्कृती, शेती जाणून घेण्यासाठी औरंगाबाद येथील एक वृद्ध व्यावसायिक दाम्पत्याने गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान गावाने विकास कामात व ग्रामस्वच्छतेत अल्पावधीत घेतलेली भरारी व विविध उपक्रम पाहून या दाम्पत्याने शाळेला १० संगणक भेट म्हणून दिले.

औरंगाबाद येथील व्यावसायिक मजहर हुसेन व तस्सनीम बानो हुसेन यांनी कन्नड तालुक्यातील वाकी येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक यादव जंजाळ यांच्याकडे शेती व ग्रामीण भागातील संस्कृतीची माहिती जाणून घेण्यासाठी गावाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर या दाम्पत्याने १ जानेवारी रोजी गावाला भेट दिली. यावेळी गावातील स्वच्छतेसाठी राबविलेले इतर उपक्रम पाहून गावासाठी काहीतरी निधी देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. गावासाठी काय हवे? असा प्रश्नही त्यांनी ग्रामस्थांना विचारला. ग्रामस्थांनीही गावासाठी काही नको. द्यायचे असेल तर शाळेला संगणक द्या, असे सुचविले. त्यानंतर मजहर हुसेन यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. मुलांची शिक्षणाविषयीची ओढ जाणून घेतल्यानंतर शाळेला १० संगणक भेट देण्याचा शब्द देऊन त्यासाठी लागणारा निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दरवर्षी शाळेला भेट देण्यासाठी येणार असल्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखविला. शाळेला १० संगणक मिळणार असल्याने विद्यार्थीही आनंदी झाले.  ग्रामस्थांनीही या दाम्पत्याचा सत्कार केला. यावेळी मजहर हुसैन, तस्सनीम बानो हुसैन, श्रीराम जंजाळ, यादवराव गुरुजी, पोलीस पाटील शिवाजी तरळ, मुख्याध्यापक एस. के. चव्हाण, शिंदे, डवणे, शेळके, योगेश जंजाळ आदींची उपस्थिती होती. 

गावाने पटकावले अनेक पुरस्कार
वाकी गावाने स्मार्ट ग्राम योजना अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षातील १० लाख रुपयांचा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार, २०१६-१७ वर्षातील निर्मल ग्राम पुरस्कार तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यात आता जिल्हा स्मार्ट ग्राम योजना अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी गावाचा सहभाग असल्याने गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आहे.

गावाची एकी पाहून भारावून गेलो 
ग्रामस्वच्छतेत गावाने घेतलेली गरूडझेप, गावात झालेली विकासकामे, तसेच गावाची एकी पाहून भारावून गेलो आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने वाकी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा.राजकीय हेवेदावे बाजूला ठेवले तर प्रत्येक गाव हगणदारीमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी मजहर हुसैन व तस्सनीम बानो हुसैन या दाम्पत्याने व्यक्त केला.

Web Title: The old couple impressed by seeing the unity and progress of the village; 10 computer gifts to the school after the visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.