मराठवाड्यात वाढतोय ओमायक्राॅनचा विळखा, ८ रुग्णांचे निदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 12:19 PM2022-01-10T12:19:11+5:302022-01-10T12:21:03+5:30
Omicron Variant in Marathwada: उस्मानाबादमध्ये ५ नवे रुग्ण; औरंगाबाद, जालना, लातूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची वाढ
औरंगाबाद : मराठवाड्यात ओमायक्राॅनचा विळखा वाढत असून, रविवारी ओमायक्राॅनबाधित ८ रुग्णांचे निदान झाले. यामध्ये सर्वाधिक ५ रुग्ण हे उस्मानाबादमधील असून, औरंगाबाद, जालना, लातूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. औरंगाबादमधील रुग्ण हा २४ वर्षीय तरुण असून, तो काही दिवसांपूर्वीच अमेरिकेहून परतला होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, रुग्ण गृह अलगीकरणामध्ये आहे.
मराठवाड्यात आतापर्यंत उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले होते. यामध्ये रविवारी जालन्याचीही भर पडली. तर औरंगाबादमध्ये आतापर्यंत २ रुग्णांचे निदान झाले होते. हे दोन्ही रुग्ण उपचार घेऊन ओमायक्राॅनमुक्त झाले आहेत. परंतु, औरंगाबादमध्ये रविवारी आणखी एका रुग्णाची वाढ झाली.
औरंगाबादमधील २४ वर्षीय रुग्ण २४ डिसेंबर रोजी अमेरिकेहून परतला होता. दिल्लीमार्गे औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर शहराबाहेर जाण्यासाठी २९ डिसेंबर रोजी कोरोना तपासणी केली असता, त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर त्याचा नमुना जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल रविवारी आला आणि त्यातून हा तरुण ओमायक्राॅनबाधित असल्याचे निदान झाले. कोरोना पाॅझिटिव्ह येऊन १० दिवस झाले असून, त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
रुग्णाची प्रकृती स्थिर
औरंगाबादमधील २४ वर्षीय ओमायक्राॅनबाधित तरुण हा सध्या गृह अलगीकरणामध्ये आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या आई-वडिलांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याची सोमवारी (दि. १०) आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वाॅर रुम प्रमुख डाॅ. मेघा जोगदंड यांनी दिली.
मराठवाड्यातील एकूण ओमायक्राॅनबाधित
जिल्हा - एकूण रुग्ण
- उस्मानाबाद - ११
- लातूर - २
- नांदेड - ३
-औरंगाबाद - ३
- जालना - १