पीएच.डी.साठी मागितले दीड लाख!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 02:33 AM2018-08-23T02:33:02+5:302018-08-23T02:34:18+5:30
विद्यार्थ्याची ‘आॅडिओ’सह विद्यापीठात लेखी तक्रार
- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी. विभागाच्या कक्ष अधिकाऱ्याने पीएच.डी.साठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडे दीड लाख रुपये मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. आठ दिवसांपूर्वीच्या या धक्कादायक प्रकाराची माहिती बुधवारी ‘लोकमत’च्या हाती लागली.
संबंधित विद्यार्थ्याने ‘आॅडिओ क्लिप’सह प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विद्यापीठाने संगणकशास्त्र विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. रत्नदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. त्यात डॉ. रमेश मंझा आणि डॉ. सत्यवान धोंडगे यांचा समावेश आहे. समितीची पहिली बैठक गुरुवारी होणार आहे. विद्यार्थ्याचा शोधप्रबंध दोन बहिस्थ परीक्षकांकडे पाठविणे, त्यांच्याकडून तात्काळ अहवाल मागविणे, कागदपत्रे दाखल करून घेणे, अहवालानंतर मौखिक परीक्षेसाठीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी कक्ष अधिकारी व एका कंत्राटी कर्मचाºयाने दीड लाख रुपये मागितले. विद्यापीठाशी संबंध नसलेल्या बँक खात्यात पैसे टाकण्यासही विद्यार्थ्याला सांगण्यात आले होते. पीएच.डी.साठी पैसे मागितल्याच्या तोंडी तक्रारी कुलगुरू, प्रकुलगुरूंकडे यापूर्वी झालेल्या आहेत.
पाचशेपासून मागणी
संशोधक विद्यार्थ्यांना कोणत्याही कामासाठी पाचशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत लाचेची मागणी होते. संशोधक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी पीएच.डी. विभागात पुन्हा येण्याची गरज पडू नये, यासाठी अधिकची लाच देतात, असे बोलले जाते.
संशोधक विद्यार्थ्याची तक्रार आली आहे. समिती नेमली असून, संबंधित कर्मचारी, अधिकाºयांची बदलीही करण्यात येणार आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही.
- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ