औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या प्रवेश कमानीवर चढून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. तर याच दरम्यान, दुसऱ्याने प्रवेशद्वारासमोर स्वतःवर डीझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोघांनाही वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
एका अतिक्रमण प्रकरणात कारवाईसाठी नरेश पाखरे आणि जय किशन कांबळे यांनी महापालिकेकडे तक्रार दिली होती. वारंवार पाठपुरावा करूनही यावर कारवाई झाली नसल्याने त्यांनी संतापाच्या भरात महापालिकेसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान, नरेश पाखरे हा मनपा मुख्यालयातील प्रवेशद्वाराजवळील इमारतीच्या गच्चीवर चढला. तेथून त्याने घोषणाबाजी करीत उडी मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान, जय किशन कांबळे याने प्रवेशद्वारासमोर डिझेल टाकून घेण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले आहे.
तीन वर्षांपासून अतिक्रमणाविरोधात पाठपुरावा काल्डा कॉर्नर येथे युसुफ मुकाती यांचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. मागील तीन वर्षांपासून अतिक्रमणे हटविण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम कोणतीच कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही आत्मदहनाचा आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.