एक शस्त्रक्रिया अन् १५ रक्त पिशव्या; डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने महिलेला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 07:28 PM2020-08-07T19:28:47+5:302020-08-07T19:34:06+5:30
अनेक दवाखान्यांत लागेल तो खर्च करण्याची तयारी दाखवली. मात्र, सगळ्यांनी हात वर करून घाटीकडे बोट दाखवले.
औरंगाबाद : पाच महिन्यांच्या गर्भवती मुलीच्या प्रसूतीत गुंतागुंत असल्याने बीडमध्ये खाजगी रुग्णालयात सिझेरियन केले. बाळ जगले नाही. रक्तस्रावही सुरू झाला. तो थांबत नसल्याने त्या डॉक्टरांनी औरंगाबादला पाठवले. अनेक दवाखान्यांत लागेल तो खर्च करण्याची तयारी दाखवली. मात्र, सगळ्यांनी हात वर करून घाटीकडे बोट दाखवले. घाटीत पोहोचलो. डॉक्टरांनी धीर देत १५ रक्तपिशव्या लावत यशस्वी शस्त्रक्रिया करून मुलीचा जीव वाचवल्याचे रुग्णाची आई शोभा जोगदंड सांगत होत्या.
रुग्ण पायल गायकवाड (वय २९, रा. कळसुंबर, जि. बीड) म्हणाल्या. पहिले सिझेरियन झाले होते. पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीत गर्भपिशवीत वार वरच्या बाजूस चिकटलेला होता. खाजगी दवाखान्यात २४ जुलैला सिझेरियन केले. तिथे बाळ वरून काढल्यावर रक्तस्राव सुरू झाला. डॉक्टरांनी औरंगाबाद गाठायला सांगितले. रस्त्यात अनेक डॉक्टरांना दाखवले. त्यांनी गुंतागुंत अधिकच वाढल्याने घाटीतच जाण्याचा सल्ला दिला. २५ जुलैला दुपारी २ वाजता घाटीत भरती केले. एकूण १५ रक्तपिशव्या लावल्या. इथे आल्यावर डॉक्टरांनी पुन्हा आॅपरेशन केले. आॅपरेशन थिएटरमध्ये जाताना डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिलेला धीर आणि टीमच्या प्रयत्नांमुळेच मला जीवदान मिळाले, १४ दिवसांनंतर आज घरी जातेय. माझा लहान मुलगा घरी वाट पाहतोय. त्याला भेटू शकेल, ते फक्त घाटीच्या डॉक्टरांमुळे, असे म्हणत पायल यांनी डॉक्टरांचे आभार मानले.
या टीमचे प्रयत्न
स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रूपाली गायकवाड, डॉ. अंकिता शहा, डॉ. मलिका जोशी, डॉ. श्रुतिका मकडे, डॉ. सौजन्या रेड्डी, डॉ. सुस्मिता पवार, डॉ. शंतनू पाटील, डॉ. ऋ तुजा पिंपरे, डॉ. मयुरा कांबळे, डॉ. गौरी केनी, डॉ. पायल राठोड, डॉ. हिनानी बॉक्सी, परिचारिका सुनीता असलवले, जयमाला काळसरपे, मंगल देवूलवाड, संजय राहणे, हिना इनामदार आदींनी शस्त्रक्रिया व त्यानंतर १४ दिवस पायलची देखभाल केली.
गर्भवतींनी ५ व्या महिन्यांच्या सोनोग्राफीत निदान करून घ्यावे
पूर्वी अशा केसेस २० हजारांत एक पाहायला मिळत होत्या. आता हे प्रमाण ५३४ सिझेरियन झालेल्या महिलांत एका महिलेत आढळून येते. अशा केसेसमध्ये माता मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे. तेथील डॉक्टरांनी कपडा लावून शक्य ते प्रयत्न करून पाठवले. मात्र, बीडमध्येही हे आॅपरेशन शक्य होते. प्रत्येक गर्भवती महिलेने पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीत गर्भपिशवीत प्लासेंटा खालच्या बाजूने चिकटलेला आहे का याचे निदान करून घेतले पाहिजे. त्यामुळे प्रसूतीवेळीचा रक्तस्राव टाळता येऊ शकतो.
-डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रिरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी रुग्णालय