नवीन व्यापाऱ्यांला लायसन्स दिल्याने कांदा मार्केट गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:42+5:302021-06-16T04:06:42+5:30
लासूर स्टेशन बाजार समितींतर्गत सुरू असलेल्या कांदा मार्केटमध्ये सोमवारी ३५० गाडी कांद्याची आवक आली होती. सकाळी १०.३० वाजता लिलाव ...
लासूर स्टेशन बाजार समितींतर्गत सुरू असलेल्या कांदा मार्केटमध्ये सोमवारी ३५० गाडी कांद्याची आवक आली होती. सकाळी १०.३० वाजता लिलाव सुरू झाला. लिलावात नवीन व्यापारी गणेश तवले हे बिट देत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांच्या लक्षात आले, यामुळे त्यांनी एकी करून लिलाव बंद पाडला. यामुळे बाजार समितीचे सचिवांसह संचालक मंडळ, शेतकरी नेते तत्काळ दाखल झाले. यामुळे दोन तास गोंधळ सुरू होता. नवीन व्यापारी आल्याने कांद्याचा भाव वाढल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद केल्याचा आरोप शेतकरी करीत होते. यानंतर संतोष जाधव यांच्या मध्यस्थीने लिलाव पुन्हा सुरू झाला. यावेळी कांद्याचा भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी तासभर लिलाव थांबविला. दिवसभरात दोन वेळा लिलाव बंद पडल्याने शेतकऱ्यांची फजिती झाली. यानंतर माजी सभापती कृष्णा पाटील डोणगावकर, उपसभापती दादासाहेब पाटील जगताप, दिनेश मुथा, सचिव के.आर. रणयेवले यांनी मध्यस्थी केल्यानंतर पुन्हा लिलाव सुरू झाला.