छत्रपती संभाजीनगर : राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस होत असताना मराठवाड्यात मात्र पावसाचा खो-खो सुरू आहे. ५३ दिवसांत फक्त ३७.८ टक्के पाऊस झाला आहे.
नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. १३ टक्के पावसाची तूट असल्याने पेरण्यांचा पहिला टप्पा संपत आला आहे. मागील ५३ दिवसांमध्ये २५१.१ मि.मी. पाऊस झाला आहे. १५७ टक्के म्हणजेच ४३७ मि.मी.पाऊस मागील वर्षी झाला होता.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाळ्यात ६७९.५ मि.मी. सरासरी पावसाचे प्रमाण असून, मागील ५३ दिवसांमध्ये २५१.१ मि.मी. पाऊस झाला आहे. १५७ टक्के म्हणजेच ४३७ मि.मी.पाऊस मागील वर्षी झाला होता. ३४० मि.मी. पाऊस या दोन महिन्यांत होणे अपेक्षित होता. ९० मि.मी. पावसाची तूट आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांवर परिणाम झालाच आहे.
अहमदनगरमध्ये पिकांनी टाकल्या माना
अहमदनगर जिल्ह्यात पाच दिवसांपासून रोज ढग येतात. त्यापाठोपाठ हवामान खात्याचा पावसाचा इशाराही येतो. मात्र, पाऊस न पडता ढग तसेच निघून जातात. आभाळाकडे नजरा लावून बसलेला शेतकरी पुन्हा माना टाकलेल्या पिकांकडे पाहत ओशाळून जातो, असे चित्र आहे. पाच दिवसांत जिल्ह्यात अवघा १९ मिलिमीटर पाऊस झाला. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने जमिनीतील ओलदेखील झपाट्याने कमी होत आहे. परिणामी, पिके सुकू लागली आहेत. संगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अत्यंत कमी म्हणजेच अवघी २० टक्के पेरणी झाली आहे.