औरंगाबाद : आठ तास कामाची सुधारीत अधिसुचना काढणे, किमान वेतन २० हजार रुपये करणे, सेल्स प्रमोशन कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आदी मागण्यांसाठी आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने संप पुकारत क्रांतीचौकात जोरदार निदर्शने केली. निदर्शनानंतर संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
क्रांतीचौकात संघटनेतर्फे वैद्यकीय प्रतिनिधींने एकत्र येत विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यात बोनस अॅक्टची अंमलबजावणी करणे, प्रस्तावित कामगार विरोधी कायद्यात सुधारणा करणे, विक्री संवर्धन कर्मचारी कायदा (सेवा व शर्ती)अधिनियम १९७६ अनुसार फॉर्म ‘ए’ प्रमाणे औषधी कंपन्यांनी वैद्यकीय प्रतिनिधींना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक करणे, तसे न केल्यास कंपन्यांवर कायदेशिर करवाई करणे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी मागण्यांसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी संघटनेचे अजय चौधरी, आर. डी. राठोड, गोपाळ कासार, अनिल महाजन, शंकर जाधव, विशाल भुमरे, पराग कुलकर्णी, सुदाम जरारे, हबीब हदी, जीवन राजपूत, शेख वसीम, अस्लम खान, रुपेश बैरागी आदी उपस्थित होते.